16 व्या शतकात एका योगी बाबांनी हे गाव वसविले, अशी आख्यायिका आहे. देवीने दिलेल्या स्वप्नदृष्टांतानुसार, सड्यावरील पारदुळे यांच्या परसात हरकिणाच्या राशीत मी आहे. तेथून मला आणून माझी गावात स्थापना कर. त्याप्रमाणे योगी बाबाने शोध घेतला असता गंडकी शिळेची अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील देवीची मूर्ती तेथे सापडली. त्यावेळी लहानसे मंदिर बांधून त्यात त्यांनी देवीच्या या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुढे शके 1653 (5 जुले 1731) रोजी थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात मंदिराचे नूतनीकरण होऊन मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. तोच पेशवेकालीन थाट आजही या उत्सवात अनुभवायला मिळतो.
advertisement
गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या 18 दिवसांच्या या दुर्गोत्सवाचा उद्या मुख्य दिवस आहे. संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण असून घराघरासमोर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, घरांवर डुलणाऱ्या पताका आणि रथाच्या मार्गावर घातलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्यांनी गावाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. उद्या दुपारी रथाची विधिवत पूजा झाल्यानंतर, देवीचा भव्य रथ भाविकांच्या खांद्यावर विराजमान होऊन ग्रामप्रदक्षिणेसाठी निघेल. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही येथे 'बारा बलुतेदार' पद्धतीचे दर्शन घडते. पेशवेकाळात ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्यांनुसार प्रत्येक समाज आजही आपली सेवा पूर्ण निष्ठेने देवीच्या चरणी अर्पण करतो. हा रथोत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून, तो गावातील सामाजिक एकोप्याचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा सोहळा ठरतो.
उद्याच्या या दिमाखदार रथोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक आंजर्लेत दाखल झाले आहेत. 'आई जगदंबेच्या' जयघोषाने आणि वाद्यांच्या गजराने उद्या आंजर्लेचा समुद्रकिनारा घुमणार आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
