मुंबई : आषाढी एकादशी म्हटले, आपल्याला आळंदी, पंढरीची वारी डोळ्यासमोर येते. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात आषाढी एकादशीचे विशेष असे महत्त्व आहे. उद्या 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. पण या एकादशीला देवशयनी एकादशी असे का म्हटले जाते, हे अनेकांना माहिती नसेल. त्यामुळे याबाबत पौराणिक विद्या अभ्यासक सुरज सदानंद म्हशेळकर यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी/महाएकादशी/देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. ही एकादशी उद्या बुधवारी 17 जुलै 2024 रोजी आहे. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो आणि हा काळ कार्तिकी एकादशीला संपतो.
अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी) बाहेर येतात. या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो.
काय आहे यामागची कहाणी -
भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाच्या हातून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून तुझा मृत्यू होईल, असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही, असा मनात विश्वास ठेवत देवांवर आक्रमण केले. यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले.
त्यादिवशी मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचे नाव एकादशी होते आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती यादिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते, त्यांना पापातून मुक्तता मिळते, असा समज आहे. तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते, असेही मानले जाते.
आषाढी एकादशी 2024 तारीख आणि वेळ -
यंदा 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. एकादशी तिथी 16 जुलै रोजी रात्री 8.33 वाजता सुरू होईल आणि 17 जुलै रोजी रात्री 9.02 वाजता समाप्त होईल.
सूचना - ही बातमी ज्योतिषाचार्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.





