आशिया कपसाठी टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसंच टेस्ट टीमचा कर्णधार शुभमन गिल याला टीमचं उपकर्णधार करण्यात आलं आहे. शुभमन गिलचं भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे तो कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करणार? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. गिल अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला खेळला तर संजू सॅमसन कितव्या क्रमांकावर बॅटिंग करणार? याबाबतही चर्चा सुरू झाल्या.
advertisement
आशिया कपसाठी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याबाबत चर्चा सुरू असतानाच क्रिकबझने टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये कोण सहभागी झालं याबाबतचं वृत्त दिलं आहे. प्रॅक्टिस सेशनमधल्या खेळाडूंच्या सहभागामुळे प्लेयिंग इलेव्हनमध्येही त्यांनाच संधी मिळणार का? अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.
कुणी केली प्रॅक्टिस?
शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांनी नेटमध्ये बॅटिंग केली, तर संजू सॅमसन नेटसमोर बसून हे सगळं बघत होता. याशिवाय वरुण चक्रवर्ती याने टी दिलीप यांच्यासोबत कॅच प्रॅक्टिस केली. टी दिलीप हे टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आहेत. संजू सॅमसनने फिल्डिंगचा सराव केला नाही, पण त्याने अगदी थोडा वेळ बॅटिंग प्रॅक्टिस केली. तर हार्दिक पांड्या, बुमराह, अर्शदीप आणि शिवम दुबे यांनी नेटमध्ये बॉलिंग प्रॅक्टिस केली.
संजूला दुखापत
टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनदरम्यान संजू सॅमसन लंगडताना दिसल्याचं वृत्त रेव्हस्पोर्ट्सने दिलं आहे. पायाला दुखापत झाल्यानंतर संजू मैदानातच विव्हळत होता. संजूची दुखापत किती गंभीर आहे, याबाबतची माहिती अजून मिळू शकलेली नाही, पण त्याच्या प्लेयिंग इलेव्हनमधल्या सहभागाबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आशिया कपसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, संजू सॅमसन, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षीत राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती