ढाका: बांगलादेश सरकारने इंडियन प्रीमियर लीग (IPL)चे देशातील सर्व सामने आणि कार्यक्रमांचे प्रक्षेपण अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 हंगामातून वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान यांना अचानक वगळण्यात आल्याच्या वादानंतर हा कठोर निर्णय घेण्यात आला.
advertisement
2026 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्ताफिझूर रहमान यांना 9.2 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केकेआरला त्यांना संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामागे कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आले नाही.
बांगलादेशच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांना पत्र पाठवून, बीसीसीआयच्या या निर्णयामागे “कोणतेही तर्कसंगत कारण नाही” असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे बांगलादेशातील जनतेला “दुःख, वेदना आणि तीव्र नाराजी” वाटली असून, IPL प्रसारणबंदी हा “सार्वजनिक हिताचा” निर्णय असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
मंत्रालयाच्या अधिकृत पत्रात नमूद करण्यात आले आहे की, 26 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या IPL स्पर्धेतून बांगलादेशचा स्टार खेळाडू मुस्ताफिझूर रहमान यांना वगळण्याचा निर्णय समोर आला आहे. या निर्णयाचे कोणतेही ठोस कारण समजत नसल्याने संपूर्ण बांगलादेशात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत IPL चे सर्व सामने आणि संबंधित कार्यक्रमांचे प्रक्षेपण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान बीसीसीआयकडूनही या निर्णयामागील ठोस कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. केवळ “सध्याच्या परिस्थितीशी संबंधित” असे अस्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भारतात वाढत असलेल्या बांगलादेशविरोधी भावना आणि बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे संतप्त झालेल्या काही धार्मिक संघटनांकडून केकेआर आणि संघाचे सह-मालक शाहरुख खान यांना धमक्या दिल्या जात असल्याच्या चर्चांमुळेच हा निर्णय घेतला गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा वाद आता केवळ IPLपुरता मर्यादित राहिलेला नाही. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपर्यंत (ICC) धाव घेतली असून, 2026 टी-२० विश्वचषकातील भारतात होणारे आपले सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणीही अधिकृतपणे केली आहे.
