दक्षिण आफ्रिकेच्या डावात सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 28 धावा दिल्या, तर वरुण चक्रवर्तीला तब्बल 47 धावा मोजाव्या लागल्या. हार्दिक पंड्याने 4 षटकांत 45 धावा दिल्या, वॉशिंग्टन सुंदरने 2 षटकांत 17 धावा खर्च केल्या, तर शिवम दुबेच्या 2 षटकांत 32 धावा झाल्या. या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराहने मात्र अचूक आणि धारदार मारा करत ४ षटकांत केवळ 18 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
advertisement
जर बुमराहनेही इतर गोलंदाजांप्रमाणे धावा दिल्या असत्या, तर आफ्रिकेचा स्कोअर सहज 200 च्या पुढे गेला असता. त्याच्या किफायतशीर गोलंदाजीमुळेच भारताला सामना लढतीत ठेवण्याची संधी मिळाली. मधल्या षटकांत त्याने टाकलेले टाईट ओव्हर्स आणि घेतलेल्या विकेट्समुळे आफ्रिकेचा वेग काही प्रमाणात रोखला गेला.
188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच डळमळीत झाली. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने डाव सावरता आला नाही. शिवम दुबेने आक्रमक फलंदाजी करत 42 धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. परिणामी भारताचा डाव निर्धारित षटकांपूर्वीच आटोपला आणि ७६ धावांचा मोठा फरक नोंदवला गेला.
या सामन्यात भारताने विजय मिळवला असता, तर ‘मॅन ऑफ द मॅच’चा मान शिवम दुबेऐवजी जसप्रीत बुमराहकडे गेला असता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण एका बाजूला इतर गोलंदाजांवर धावांचा पाऊस पडत असताना बुमराहने दाखवलेली शिस्तबद्ध गोलंदाजी आणि घेतलेल्या 3 विकेट्स या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकल्या असत्या.
भारतासाठी हा पराभव धक्कादायक असला, तरी बुमराहची कामगिरी आशादायक ठरली आहे. पुढील सामन्यांमध्ये गोलंदाजी विभागाला अधिक सातत्य दाखवावे लागेल, तर फलंदाजांनाही मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करताना जबाबदारीने खेळ करावा लागेल, हे या सामन्याने स्पष्ट केले.
