हरमनप्रीत कौर मैदानावर प्रचंड संतापली
चौथ्या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक नाट्यमय प्रसंग घडला. टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानावर प्रचंड संतापलेली पाहायला मिळाली. फिल्डिंग लावताना ती आपल्या खेळाडूंवर ओरडताना आणि त्यांना रागात सूचना देताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, विजयानंतर हरमनप्रीतने या रागाचे कारण स्पष्ट केले. तिने सांगितले की, ओव्हर पूर्ण करण्यासाठी वेळ कमी उरला होता आणि स्लो ओव्हर रेटच्या पेनल्टीमुळे शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ तीन फिल्डर बाउंड्रीवर ठेवण्याची वेळ येऊ नये, अशी तिची इच्छा होती.
advertisement
काय म्हणाली हरमनप्रीत कौर?
मॅचची वेळ संपत चालली होती, म्हणून मला सर्व खेळाडू वेळेवर त्यांच्या जागी हजर करायचे होते. शेवटच्या ओव्हरमध्ये तीन फिल्टर बाहेर उभे राहावेत असं मला वाटत नव्हतं. मी बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे, म्हणून मी प्रत्येक सामन्यानंतर सुधारणा करण्याचा प्रयत्न करते, असं म्हणत हरमनप्रीत कौरने रागाचं कारण सांगितलं.
टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर
दरम्यान, भारतीय बॅटर्सनी या मॅचमध्ये आपली ताकद दाखवून दिली असली तरी, बॉलिंग आणि फिल्डिंगच्या बाबतीत सुधारणेला वाव असल्याचं कॅप्टनने मान्य केलं. श्रीलंकेने नोंदवलेला 191 हा त्यांचा टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर ठरला. या मॅचमध्ये दोन्ही इनिंग्स मिळून एकूण 412 रन झाले, जो महिला क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा स्कोअर आहे. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून प्रत्येक मॅचनंतर चुका सुधारण्यावर भर देत असल्याचेही हरमनप्रीतने शेवटी नमूद केलं.
