आरसीबीचा डावखुरा फास्ट बॉलर यश दयाळ आयपीएलचा हा पूर्ण मोसम खेळणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे यश दयाळ आयपीएलमध्ये खेळणार नाही, पण त्याचा आरसीबीसोबतचा करार कायम राहणार आहे, असंही मो बोबाट म्हणाले आहेत.
आरसीबीकडे डेथ बॉलर नाही
यश दयाळ आयपीएल खेळणार नसल्याचं अगदी शेवटच्या क्षणी समोर आलं आहे, कारण आयपीएलचा पहिला सामना 28 मार्चपासून सुरू होणार आहे, आणि पहिलाच सामना आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होईल. यश दयाळ हा आरसीबीकडून डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो, मागच्या मोसमातही दयाळने आरसीबीला चॅम्पियन करण्यात योगदान दिलं होतं, आता आरसीबीला यश दयाळऐवजी दुसरा बॉलर शोधावा लागणार आहे. जॉश हेजलवूड आणि यश दयाळ हे आयपीएलच्या मागच्या मोसमात आरसीबीचे डेथ बॉलर होते, पण आता दोघेही उपलब्ध नसल्यामुळे आरसीबीला या मोसमात नवा पर्याय शोधावा लागणार आहे. आरसीबीकडे सध्या भुवनेश्वर कुमार हा एकमेव अनुभवी फास्ट बॉलर आहे.
advertisement
यश दयाळवर महिला अत्याचाराचे आरोप
यश दयाळ याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोपही झाले आहेत. दोन महिलांकडून यश दयाळ याच्यावर अत्याचाराचे आरोप झाले, यातली एक अल्पवयीन मुलगी होती. जयपूरमध्ये यश दयाळविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. क्रिकेटमध्ये पुढे नेण्याचं आश्वासन देऊन अल्पवयीन मुलीचं शोषण केल्याचा आरोप यश दयाळवर आहे. याशिवाय गाझियाबादमध्येही यश दयाळ याच्यावर महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. 24 डिसेंबर 2025 रोजी जयपूरच्या पॉक्सो न्यायालयाने यश दयाळची अंतरिम जामिनाची याचिका फेटाळून लावली.
आयपीएलआधी यश दयाळचं लग्न
आयपीएल 2026 च्या आधी यश दयाळने त्याची गर्लफ्रेंड श्वेता पुंडीरसोबत लग्नही केलं. 4 फेब्रुवारीला नोएडामध्ये दोघांनी गुपचूप लग्न उरकलं, ज्यात फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते. श्वेता पुंडीर दिल्लीमधली असून कंटेट क्रिएटर आहे.
यश दयाळ हा वैयक्तिक आणि कायदेशीर कारणांमुळे क्रिकेटपासून लांब आहे. या कारणामुळेच यश दयाळ यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं आरसीबीने स्पष्ट केलं. पोलीस तपास आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच यश दयाळचं क्रिकेटमधील पुनरागमन अवलंबून असणार आहे.
