'डबल महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकावल्यानंतर जल्लोष सुरू असताना हर्षवर्धन सदगीरने अचानक कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. पण निवृत्तीच्या घोषणेच्या 24 तासात आता त्याने या निर्णयातून यु टर्न घेतला आहे.
खरं तर किताबी लढतीनंतर चाहत्यांच्या गराड्यात अडकल्यानंतर तालमीत पोहोचण्यास उशीर झाल्यानंतरही सहकाऱ्यांनी केलेले स्वागत यामुळे आपण भारावून गेलो.किताबी लढतीत सराव सहकारी महेंद्र गायकवाड याच्यावर मात केल्याचे दु:ख असले तरी शेवटी खेळात कोण तरी एकच जण जिंकत. यावेळी मी जिंकलो, भविष्यात महेंद्र देखील हा किताब जिंकू शकतो, असे हर्षवर्धन म्हणाला आहे.
advertisement
दुसरे विजेतेपद आणि त्यामुळे झालेल्या आनंदाच्या भरात मी बोलून गेलो, माझा निवृत्तीचा विचार अजिबात नाही. माझ्याकडे अनुभव दांडगा असुन त्याचा उपयोग करून मला अजून खूप खेळायचे आहे,असे हर्षवर्धनने सांगत निवृत्तीच्या निर्णयातून यु टर्न घेतला आहे.
तसेच पहिल्या विजेतेपदानंतरमला शासनाकडून सेवेत सामावून घेतले जाईल अशी अपेक्षा होती. अनेक प्रयत्न केले. पण ते फोल ठरले.मात्र आता सरकारची भूमिका बदलली आहे. यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत दाखल करून घेतले जाते. भविष्यात सरकारने शासकीय सेवेत रुजू होण्याचा प्रस्ताव ठेवल्यास नक्कीच स्विकारेने, असे देखील हर्षवर्धन म्हणाला आहे.
राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे आपले स्वप्न आहे.कोरोनाच्या काळात संधी मिळाली होती. मात्र तेव्हा स्पर्धाच रद्द झाल्यामुळे माझे स्वप्न अर्धवट राहिले. आता भविष्यात अधिक मेहनत करून ते स्वप्नही साकार करण्याचे उद्दीष्ट आपण ठेवले असल्याचे हर्षवर्धनने सांगितले.
