सध्या वनडेचा कर्णधार रोहित शर्माचं आहे. त्याला 2027चा वर्ल्ड कप खेळायचा आहे. यासाठी त्याने वनडे क्रिकेटमध्ये खेळणे कायम ठेवले. पण बीसीसीआय रोहितच्या निवृत्त होण्याआधीच नेतृत्व बदलाचा विचार करतेय. त्यामुळे श्रेयस अय्यरचे नाव पुढे आले होते. परंतु बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले होते की अशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट सांगून टाकले. पण आता मीडिया रिपोर्टनुसार,रोहितनंतर भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदासाठी शुभमन गिल हा एकमेव दावेदार मानला जात आहे.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार, रोहितच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवली जाईल. सध्या या पदासाठी दुसरा कोणीही दावेदार नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली "विभाजित कर्णधारपद" (वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार) ही काही काळासाठीच आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. भविष्यात, गिल भारताच्या प्रत्येक फॉरमॅटचा कर्णधार असेल,असे या अहवालात स्पष्ट सांगितले आहे.
कर्णधारपदाचा रेकॉर्ड काय?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान शुभमन गिलला रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघात उपकर्णधार बनवण्यात आले होते. या स्पर्धेत भारताने विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर त्याने आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला भारताचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.रोहित शर्माने अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
शुभमन गिलचा कसोटी कर्णधार म्हणून पहिला अनुभव यशस्वी झाला. त्याने इंग्लंडमध्ये भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली आणि तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता. आता गिल 2025 च्या आशिया कपमध्ये टी20 स्वरूपात परतेल,जिथे तो सूर्यकुमार यादवचा उपकर्णधार असेल.
रोहित शर्माच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल अनिश्चितता कायम आहे.ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही त्याची शेवटची एकदिवसीय मोहीम असू शकते असे वृत्त आहे. काही वृत्तांतात असेही म्हटले आहे की एकदिवसीय संघात त्याचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याला विजय हजारे ट्रॉफी खेळावी लागू शकते.अशा परिस्थितीत आता पुढे काय होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.