श्रीलंकेकडून हसिनी परेरा आणि अटापट्टूने डावाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 59 रन जोडल्या. हसिनी 33 रनवर बाद झाली. त्यानंतर कर्णधार चामारी अटापट्टूने 37 बॉलमध्ये 52 रन काढल्या. दोन्ही ओपनर आऊट झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव डळमळीत झाला आणि भारतीय बॉलरनी एकामागून एक विकेट घेतल्या आणि श्रीलंकेच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या. इमिश दुलानी 29 रनवर आऊट झाली, तर हर्षिताने 20 रनचे योगदान दिले. कविता आणि निलीक्षाका यांनी प्रत्येकी 13 रन केल्या. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर श्रीचरणीला एक विकेट मिळाली.
advertisement
मानधना-शफालीची विक्रमी शतकी पार्टनरशीप
यापूर्वी, स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध 2 बाद 221 रनचा विक्रम केला. भारतीय महिला टीमचा टी-20 क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर होता. पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर, स्मृतीने 48 बॉलमध्ये 11 फोर आणि 3 सिक्सह 80 रन केल्या. शफालीने 46 बॉलमध्ये 12 फोर आणि एका सिक्ससह 79 रन केल्या, शफालीचे हे सलग तिसरे अर्धशतक होते. या दोघींनी 162 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली, जी या फॉरमॅटमध्ये कोणत्याही भारतीयाने कोणत्याही विकेटसाठी केलेली सर्वोच्च पार्टनरशीप आहे.
रिचा घोषच्या 16 बॉलमध्ये 40 रन
रिचा घोष (16 बॉलमध्ये 40 रन नाबाद) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (16 नाबाद) यांनी 23 बॉलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 53 रनची नाबाद पार्टनरशीप केली आणि भारताला या फॉरमॅटमधील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्येपर्यंत पोहोचवले. डिसेंबर 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टीमचा मागील सर्वोत्तम स्कोअर हा 4 बाद 217 होती. भारताने त्यांच्या डावात 28 फोर आणि आठ सिक्स मारले, ज्यामुळे या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक बाऊंड्री मारण्याचा विक्रम झाला.
स्मृतीच्या 10 हजार रन पूर्ण
या सामन्यात स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती 10 हजार रन पूर्ण करणारी भारताची दुसरी आणि जगातली चौथी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारताची मिताली राज, इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स आणि न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण केल्या आहेत, पण स्मृती मानधनाने सगळ्यात कमी 281 इनिंगमध्ये 10 हजार रन पूर्ण करून नवा विक्रम केला आहे.
