यवतमाळ: परिस्थितीशी दोन हात करत जिद्द आणि मेहनतीनं प्रयत्न केल्यास मोठ्या यशाला गवसणी घालता येते. यवतमाळमधील रेल्वे लाईनजवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गुंजन अर्जुन खिंची हिनं हे सत्यात उतरवून दाखवलं आहे. आई-वडील रस्त्याच्या कडेला लोखंडी तवा, पाटा-वरवंटा विकून उदरनिर्वाह चालवतात. तर लेकीनं उत्तर प्रदेशातील झाशी येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केलीय. विदर्भ संघाचं प्रतिनिधीत्व करताना तिनं रौप्य पदक मिळवलंय.
advertisement
विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व
केंद्र शासन व उत्तर प्रदेश राज्याच्या वतीने बुंदेलखंड विद्यापीठ झाशी येथे 17 ते 19 मार्च दरम्यान खेलो इंडिया वरिष्ठ गट महिलांच्या खो खो लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यवतमाळ येथील गुंजन खिंची हिने विदर्भ संघाचे प्रतिनिधीत्व केले. विदर्भ संघ या स्पर्धेत दमदार खेळाचे प्रदर्शन करीत रौप्य पदकाचा मानकरी ठरलाय. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांच्या हस्ते उपविजेत्या संघाला चषक, दीड लाख रुपये रोख व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.
उमेदीच्या काळात गाजवलं कुस्तीचं मैदान, म्हातारपणी शेळ्या राखून जगण्याची वेळ, Video
आई-वडिलांना चांगल्या घरात नेण्याचं स्वप्न
"आम्ही गेल्या 50 वर्षांपासून अतिक्रमण करून असलेल्या जागेवर झोपडी बांधून राहत आहोत. आई-वडील फुटपाथवर तवा, पोळपाट, लाटणे, पाटा वरवंटा विक्री करतात. मला लहान बहीण भाऊ असून ते शिकत आहेत. इतकी वर्षे या घरात आईवडिलांनी दिवस काढलेत. पण मला चांगल्या नोकरीवर लागून आईवडिलांना इथून बाहेर काढत चांगल्या घरात न्यायचं आहे. हे माझं स्वप्न असल्याचं गुंजनने सांगितले.
प्रशिक्षकांचं मोलाचे सहकार्य
"यवतमाळ येथील रेल्वे स्टेशन समोरील नगर परिषद शाळा क्रमांक 12 मध्ये गुंजन शिकत होती. तेव्हा नगर परिषद शाळेच्या क्रीडा महोत्सवात खो खो खेळताना प्रशिक्षक अविनाश जोशी यांनी गुंजनला पाहिले. तिच्यातील खेळाचं कौशल्य ओळखून त्यांनी तिला अभ्यंकर कन्या शाळेच्या क्रीडांगणावर आणले आणि खो खोचे प्रशिक्षण दिले," असे गुंजनने सांगितले.
गुंजन करते साडीच्या दुकानात काम
गुंजनच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ती देखील कधीकधी साडीच्या दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावते. हलाखीची परिस्थिती असताना देखील तिने कधी मैदान सोडले नाही. गुंजन ही सध्या बाभुळगाव येथील शिवशक्ती महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षात शिकत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना दिले असून तिच्यातील जिद्दी खेळाडू अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.