आज जवळपास प्रत्येक नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणात USB-C पोर्ट पाहायला मिळतो. पण कधी विचार केलाय का की, या नावामध्ये 'C' चा नक्की अर्थ काय असतो? अनेकजण याला चार्जिंग किंवा केबलशी जोडतात, पण सत्य मात्र काहीतरी वेगळंच आहे. चला तर मग, आपल्या खिशातील चार्जरचं हे गुपित आज उलगडून पाहूया.
'C' म्हणजे नक्की काय?
advertisement
खरं सांगायचं तर, USB-C मधील 'C' चा कोणताही लांबलचक फुल फॉर्म नाही. हे केवळ USB कनेक्टरच्या मालिकेतील एक पुढचं पाऊल आहे. तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, हे इंग्रजी अक्षरांच्या क्रमानुसार दिलेलं नाव आहे.
USB-A: हा तो मोठा आणि चौकोनी पोर्ट आहे जो आपण जुन्या कॉम्प्युटर किंवा पेन ड्राईव्हमध्ये पाहायचो.
USB-B: याचा वापर प्रिंटर आणि काही जुन्या उपकरणांमध्ये केला जायचा.
काळाप्रमाणे यात बदल झाले आणि मायक्रो-USB तसंच मिनी-USB आले. पण त्यानंतर अधिक प्रगत आणि सोयीस्कर डिझाइन सादर करण्यात आलं, ज्याला USB-C असं नाव देण्यात आलं.
रिव्हर्सिबल डिझाइन: डोळे मिटून चार्जिंग लावा
USB-C पोर्टचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचं रिव्हर्सिबल डिझाइन. याचा अर्थ असा की, आता तुम्हाला केबल उलट आहे की सुलट, हे पाहण्याची गरज नाही. तुम्ही ती कोणत्याही बाजूने लावली तरी ती सहज कनेक्ट होते. यामुळे वापरकर्त्यांचा वेळ वाचतो आणि पोर्ट खराब होण्याचे चान्सेसही कमी होतात.
दिसायला सारखे, पण कामात वेगळे
अनेकांना असं वाटतं की सर्व USB-C केबल्स किंवा पोर्ट्स एकसारखेच असतात आणि ते समान स्पीड देतात. पण हा एक मोठा गैरसमज आहे. USB-C हे केवळ पोर्टचा आकार आणि डिझाइन सांगतं, त्याची क्षमता नाही.
काही USB-C पोर्ट फक्त सामान्य डेटा ट्रान्सफरसाठी असतात.
तर काही हाय-स्पीड ट्रान्सफर, फास्ट चार्जिंग आणि अगदी व्हिडिओ आउटपुटलाही (Video Output) सपोर्ट करतात.
थोडक्यात, बाहेरून एकसारखे दिसणारे दोन पोर्ट आतून पूर्णपणे वेगळ्या क्षमतेचे असू शकतात.
USB-C ची खरी ताकद त्याच्या नावामध्ये नसून, त्यामागे वापरलेल्या तंत्रज्ञानात असते. म्हणूनच अनेकदा पोर्टच्या बाजूला छोटी छोटी चिन्हं किंवा लेबल्स दिलेली असतात. हे लेबल तुम्हाला सांगतं की तो पोर्ट फास्ट चार्जिंगसाठी आहे की हाय-स्पीड डेटासाठी. त्यामुळे पुढच्या वेळी लॅपटॉप किंवा फोन खरेदी करताना केवळ 'Type-C' आहे ना, एवढंच न पाहता त्याची क्षमता काय आहे हे देखील नक्की तपासा.
थोडक्यात काय USB-C हे तंत्रज्ञानाच्या जगातील एक क्रांती आहे. 'C' म्हणजे केवळ एक नाव असलं, तरी त्याने आपलं चार्जिंगचं आयुष्य खूप सोपं केलं आहे
