नेमकं काय घडलं?
घणसोली परिसरातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला. शुक्रवारी (दि.20 मार्च) आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल वर्गाबाहेर ठेवले होते. परीक्षा संपल्यानंतर हे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांची दप्तरे तपासली असता तिन्ही विद्यार्थ्यांकडे संबंधित मोबाईल आढळल्याचे सांगितले जाते.
advertisement
या घटनेनंतर शिक्षिकेने सर्वांसमोर त्या विद्यार्थ्यांवर चोरीचा आरोप करत पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याचे समजते. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव निर्माण झाला. पुढे शाळा प्रशासनाने संबंधित तिन्ही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मनाई केली आणि केवळ परीक्षेच्या वेळी उपस्थित राहण्याच्या सूचना पालकांना दिल्या.
विद्यार्थ्यांवर मानसिक ताण
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि बदनामीची भावना निर्माण झाली. याच मानसिक तणावातून दोन विद्यार्थ्यांनी आपल्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा विद्यार्थी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. पालकांकडून तक्रार का करण्यात आली नाही? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
मोबाईल शाळेत कसे पोहोचले?
या घटनेमुळे शाळांमधील शिस्तीच्या पद्धती, विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण आणि त्याचे परिणाम यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही रबाळे परिसरात कॉपीच्या आरोपावरून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच, शाळेत मोबाईल नेण्यास बंदी असताना हे मोबाईल विद्यार्थ्यांकडे कसे आले, याचाही तपास होणे आवश्यक मानले जात आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे






