नेमकं घडलं काय?
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करताच बाळाच्या अंगावरील जखमा पाहून चिंता व्यक्त केली. बाळाच्या अंगावरील जखमा पाहता कुत्रा किंवा इतर भटक्या प्राण्याच्या हल्ल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या जखमा अपघाती आहेत की मुद्दाम केल्या गेल्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे या जखमा ताज्या नसून त्या किमान एक दिवस जुन्या असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.
advertisement
ही नवजात बालिकेला बोईसर येथून उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला या बाळाच्या आईने बाळ खाली पडल्यामुळे जखमा झाल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांनी अधिक चौकशी केली असता तिने वारंवार आपली भूमिका बदलत वेगवेगळी कारणे सांगितली. महिलेच्या गोंधळलेल्या उत्तरांमुळे संपूर्ण प्रकरणावर संशय आलेला आहे.
पोटच्या बाळासोबत आईचे धक्कादायक कृत्य
या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून बाळ नको असल्याने महिलेने नवजात बालिकेला उघड्यावर टाकल्याचा संशय आहे. लोकांनी जाब विचारल्यानंतर तिने बाळ परत आणले मात्र तोपर्यंत कुत्रा किंवा मांजरीच्या हल्ल्यात बालिका जखमी झाली. प्रकृती गंभीर असल्याने तिला वलसाड रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून निष्पाप नवजात बालिकेच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सत्य नेमके काय आहे याचा उलगडा तपासानंतरच होणार असून या धक्कादायक प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
