बसेस वाढणार का?
वसई–विरार शहरात बसफेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र सध्य स्थितीला बसांची संख्या अपुरी असल्याने तात्काळ वाढ करणे शक्य होत नाही. सध्या महापालिकेच्या परिवहन विभागाकडे एकूण 114 बसेस आहेत ज्या त्या मार्गांवर धावत आहेत. दररोज सुमारे 2,200 फेऱ्या होत असून हजारो प्रवासी या सेवेचा लाभ घेतात.
advertisement
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने बसमधील गर्दीही वाढली आहे. विशेषतहा सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत नोकरदारांची मोठी गर्दी होते. अनेकदा बस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करताना दिसतात. काही भागात रिक्षा वेळेवर मिळत नसल्याने प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागतो.
एप्रिलअखेर 100 नव्या ई-बस
महापालिकेने मागील दोन वर्षांत ई-बस सेवेला प्राधान्य दिले आहे. सध्या 40 ई-बस सेवेत आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान अनुदान योजनेतून आणखी 100 ई-बस मिळणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र या बस एप्रिलअखेरपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
स्मार्ट कार्ड सेवा लवकरच सुरू
बसांची संख्या वाढल्यानंतर ज्या भागात फेऱ्या कमी आहेत, तेथे प्राधान्याने सेवा वाढवली जाईल असे परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी सांगितले. तसेच सवलत योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्ट कार्ड सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
