सीमावर्ती भागात दोन्ही सैन्यांमध्ये चकमकी
हेलमंड, पक्तिया, खोश्त आणि नंगरहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमकी झाल्या असून या भागात तणाव वेगाने संघर्ष वाढत आहे. त्यामुळे सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे.
पाकिस्तानी सीमेवर जोरदार गोळीबार सुरू
गृहयुद्ध आणि टीटीपी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना तोंड देत असलेल्या पाकिस्तानला आता अफगाण सीमेवर मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील कुर्रम सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक चकमकी सुरू झाल्या आहेत. अफगाण सैन्याने पाकिस्तानी फ्रंटियर कॉर्प्सच्या चौकीवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. अफगाण सैन्याने साडेनऊच्या सुमारास तोफखान्यासह पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानच्या जवळपास १२ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
advertisement
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला तालिबानचं प्रत्युत्तर
गुरुवारी रात्री पाकिस्तानने काबूल आणि पक्तिका प्रांतांवर हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्यानंतर मागील ४८ तासांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध ताणले आहेत. काबूलमधील हवाई हल्ल्यात एका वाहनाला आणि एका घराला लक्ष्य केले गेले. पक्तिकामध्ये पाकिस्तानने एक संपूर्ण नागरी बाजारपेठ आणि ३५ निवासी घरांवर हवाई हल्ला केला. यात अनेक घरं आणि बाजारपेठ उद्ध्वस्त झाली.
या हल्ल्यानंतर शनिवारी अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मुल्ला याकूब यांनी पाकिस्तानला इशारा दिला की आता काबूल आणि पक्तिका येथे झालेल्या हल्ल्यांचे परिणाम भोगावे लागतील. त्यानंतर आज सकाळपासून अनेक सीमावर्ती भागातून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सैन्यात चकमकींचे वृत्त येत आहे. अफगाणिस्तानच्या २०१ व्या खालिद बिन वालिद आर्मी कमांडने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की काबूलवर पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सैन्याने हल्ला सुरू केला आहे.