कोझिकोडहून दोहाकडे निघालेले एअर इंडिया एक्सप्रेसचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे आज सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी उड्डाणानंतर काही वेळेतच कोझिकोड विमानतळावर परत फिरवण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसचे IX375 क्रमांकाचे हे बोइंग 737 विमान सकाळी 9:17 वाजता कोझिकोड येथून दोहासाठी निघाले होते.
मात्र, उड्डाणानंतर थोड्याच वेळात तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून विमान पुन्हा मूळ विमानतळावर परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "आमचे एक विमान तांत्रिक अडचणीमुळे उड्डाणानंतर कोझिकोडला परतले.''
advertisement
''आम्ही तातडीने पर्यायी विमानाची व्यवस्था केली, प्रवाशांना विलंबामुळे रिफ्रेशमेंट्स पुरवल्या आणि त्यानंतर विमानाने उड्डाण केले आहे. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आमच्या सर्व कामकाजात सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे हे आम्ही पुन्हा सांगू इच्छितो."
तांत्रिक बिघाड नेमका कशा प्रकारचा होता, याची सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, कंपनीने तातडीने पर्यायी व्यवस्था केल्याने मोठी गैरसोय टळली असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. याआधी देखील तांत्रिक कारणामुळे इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता.
