ढाका: बांगलादेशमध्ये पुन्हा जमावाकडून हिंसाचाराची घटना समोर आली आहे. राजबारी जिल्ह्यात एका 29 वर्षीय हिंदू तरुणाला जमावाने बेदम मारहाण करून ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव अमृत मंडल उर्फ सम्राट असे असून, हल्ल्यानंतर थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पांग्शा उपजिल्ह्यातील होसैनदांगा जुना बाजार परिसरात घडली. जमावाकडून अमृत मंडलवर हल्ला करण्यात आला आणि नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची पुष्टी करताना पांग्शा मॉडेल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शेख मोइनुल इस्लाम यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांनी अमृत मंडलवर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर परिस्थिती चिघळली आणि जमावाने हिंसक रूप धारण केले.
पोलिसांच्या नोंदींनुसार, अमृत मंडल हा परिसरातील एका स्थानिक गटाचा नेता होता आणि तो “सम्राट बाहिनी” या नावाने ओळखला जात होता. तो होसैनदांगा गावातील रहिवासी अक्षय मंडल यांचा मुलगा होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच ही हत्या नेमकी कशामुळे झाली याची घटनाक्रमासह चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आठवड्यातील दुसरी जमावाकडून हत्या
काही दिवसांपूर्वीच बांगलादेशमध्ये जमावाकडून झालेली ही दुसरी हत्या आहे. १८ डिसेंबर रोजी मयमन्सिंग जिल्ह्यातील भालुका येथे दिपू चंद्र दास या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला जमावाने मारहाण करून ठार केले होते. दिपू चंद्र दास याच्यावर कारखान्यातील एका कार्यक्रमादरम्यान इस्लामविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्या मृत्यूनंतरही जमावाने अमानुष कृत्य करत त्याचा मृतदेह झाडाला बांधून आग लावल्याचा आरोप आहे.
बांगलादेशमध्ये वाढता असंतोष
राजबारीतील ही हत्या अशा वेळी घडली, जेव्हा ढाक्यात काही तासांनंतर हिंसक निदर्शने उसळली. ही आंदोलने शरीफ उस्मान हादी या प्रसिद्ध विद्यार्थी नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ करण्यात आली होती. या घटनेनंतर काही युवक नेत्यांनी भारतविरोधी भडक विधानं केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये बांगलादेशच्या सुरक्षा दलांना ढाक्यातील भारतीय उच्चायोगाकडे जाणाऱ्या मोर्चांना रोखावे लागले होते.
तसेच गेल्या आठवड्यात चिटगावमधील भारतीय सहाय्यक उच्चायोगाच्या इमारतीवर जमावाने दगडफेक केल्याची घटनाही घडली होती.
