दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी ठामपणे सांगितले आहे की, इराणवरील हल्ले पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, जगाचं लक्ष 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' अत्यंत मोक्याच्या आणि महत्त्वाचा सागरी मार्गावर आहे. जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच मार्गावरून वाहून नेला जात असल्याने, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेबाबत हमी देण्याची मागणी अनेक राष्ट्रांनी केली आहे. लष्करी तयारी आणि राजनैतिक चर्चा या दोन्ही प्रक्रिया समांतरपणे सुरू असताना, येत्या काही दिवसांत परिस्थिती नेमकी कोणती वळणे घेईल, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
advertisement
दरम्यान, सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री, इराणची दोन प्रमुख औद्योगिक शहरे खोर्रमशहर आणि इस्फाहान यांना इस्त्रायलकडून लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यांमुळे इराणच्या वीज वितरण जाळ्याचे आणि वायू पुरवठा यंत्रणांचं मोठं नुकसान झालं आहे. एका गॅस वाहिनीला तडा गेल्यामुळे खोर्रमशहर येथील वीज निर्मिती केंद्रातील वीज उत्पादन पूर्णपणे ठप्प झालं आहे. स्थानिक वृत्तांनुसार, हा स्फोट इतका तीव्र होता की, आजूबाजूच्या परिसरांतूनही त्याच्या ज्वाला स्पष्टपणे दिसत होत्या.
इराणमधील या संघर्षाची धग आता शेजारील राष्ट्रांच्या पायाभूत सुविधांवर देखील पडत आहे. मंगळवारी पहाटे, कुवेतच्या ऊर्जा मंत्रालयाने या गोष्टीला दुजोरा दिला की, हवाई सुरक्षा यंत्रणांनी इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखली असता, त्यातून निर्माण झालेल्या ढिगाऱ्यामुळे आणि स्फोटाच्या तुकड्यांमुळे उच्च-दाबाच्या वीज वाहिन्यांचे नुकसान झालं आहे.
