ढाका: बांगलादेशात अराजकता माजली असून भारतविरोधी कट्टरपंथी नेता शरीफ उस्मान हादी याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या जमावाने अचानक संसदेवर धावा बोलला. संतप्त जमावाने संसदेत घुसून मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि लूटपाट केली आहे.
advertisement
अंत्यसंस्कार आणि चिथावणीखोर भाषणे
हिंसाचारापूर्वी हादीचा मृतदेह बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या कबरीजवळ दफन करण्यात आला. दुपारी २:३० वाजता संसद भवनाच्या साऊथ प्लाझामध्ये अंत्यविधीची नमाज (जनाजा) अदा करण्यात आली. यावेळी 'इंकलाब मंच' चे सदस्य सचिव अब्दुल्ला अल जाबेर यांनी समर्थकांना निदर्शनासाठी शाहबाग येथे जमण्याचे आवाहन केले. आम्ही इथे शोक मनवायला आलो नाही, तर न्याय मागायला आलो आहोत, असे म्हणत त्यांनी सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
मोहम्मद युनूस यांचे वादग्रस्त विधान
अंत्यविधीनंतर अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भाषण केले. ते म्हणाले, हादी आमच्या हृदयात बसला आहे. जोपर्यंत बांगलादेश अस्तित्वात राहील, तोपर्यंत प्रत्येक बांगलादेशींच्या मनात तो जिवंत राहील. त्याला कोणीही पुसू शकणार नाही. युनूस यांच्या या भाषणाने कट्टरपंथियांना अधिक बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
दंगखोरांना 'फ्री हँड' आणि निवडणुकीचा पेच
मिळालेल्या विशेष माहितीनुसार, युनूस सरकारने जाणीवपूर्वक दंगखोरांना रान मोकळे करून दिले होते. संसदेत तोडफोड सुरू असताना दोन तास तिथे पोलीस किंवा लष्कराला पाठवण्यात आले नाही. यामागे 12 फेब्रुवारीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा कट असल्याचे समोर येत आहे. अवामी लीगवर बंदी आहे आणि बीएनपीचे नेते तारिक रहमान 25 डिसेंबरला लंडनहून परतत आहेत. अशा स्थितीत अराजकता माजवून जमात-ए-इस्लामीला बळ दिल्यास युनूस यांना पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी मिळू शकते, असे राजकीय गणित मांडले जात आहे.
हिंदू तरुणाची अमानुष हत्या
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचार थांबताना दिसत नाहीत. मयमनसिंह शहरात 25 वर्षीय दिपू चंद्र दास या हिंदू तरुणावर 'ईशनिंदा' केल्याचा खोटा आरोप लावून जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकण्यात आले. या प्रकरणी रॅपिड ॲक्शन बटालियनने (RAB) 19 ते 46 वर्षे वयोगटातील सात संशयितांना अटक केली आहे.
भारतीय सैन्य 'हाय अलर्ट'वर
बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहता भारताने कडक पावले उचलली आहेत.
बॉर्डर मार्च: इंकलाब मंच आणि जमातच्या कट्टरपंथियांनी बेनापोलपासून भारतीय सीमेपर्यंत मोर्चा काढला असून शेख हसीना यांना बांगलादेशाच्या हवाली करण्याची मागणी केली आहे.
चटगावमध्ये तणाव: कट्टरपंथियांनी चटगावमधील प्रसिद्ध चंद्रनाथ मंदिराबाहेर धार्मिक घोषणाबाजी केली.
लष्करी हालचाली: भारतीय लष्कराच्या इस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर. सी. तिवारी यांनी गुरुवारी भारत-बांग्लादेश सीमेचा दौरा केला. भारतीय सैन्य सीमेवरील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
