ढाका: बांगलादेशात होऊ घातलेल्या संसदीय निवडणुकांपूर्वी एका हिंदू नेत्याला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. 12 फेब्रुवारीला देशात मतदान होणार असताना गोपालगंज-3 मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या गोविंद चंद्र प्रमाणिक यांचे नामांकन रिटर्निंग ऑफिसरने रद्द केले आहे. या निर्णयामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या राजकीय हक्कांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
advertisement
गोविंद चंद्र प्रमाणिक हे वकील असून ते बांगलादेश जातीय हिंदू महाजोत (BJHM) या संघटनेचे महासचिव आहेत. हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. माजी पंतप्रधान शेख हसीना याच गोपालगंज-3 मतदारसंघातून खासदार राहिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात सुमारे 50 टक्क्यांहून अधिक मतदार हिंदू आहेत. अशा परिस्थितीत गोविंद प्रमाणिक यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या निवडणूक नियमांनुसार अपक्ष उमेदवाराला आपल्या मतदारसंघातील किमान 1 टक्का मतदारांची स्वाक्षरी सादर करावी लागते. गोविंद यांनी हा नियम पाळत आवश्यक स्वाक्षऱ्या जमा केल्या होत्या. मात्र नंतर काही मतदारांनी रिटर्निंग ऑफिसरसमोर येऊन आपण कोणतीही स्वाक्षरी केली नसल्याचा दावा केला. यानंतर सर्व स्वाक्षऱ्या अमान्य ठरवत गोविंद यांचे नामांकन रद्द करण्यात आले.
गोविंद प्रमाणिक यांनी या प्रकरणामागे खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या मतदारसंघात BNP च्या विजयाची शक्यता जवळपास नाही. त्यामुळेच आपल्याला निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्याचा डाव रचण्यात आला. गोपालगंजमधील सुमारे 3 लाख मतदारांपैकी 51 टक्के मतदार हिंदू असल्याने आपला विजय निश्चित होता, असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून, गरज पडल्यास न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बांगलादेशी वृत्तपत्र ‘द डेली स्टार’नुसार, गोविंद यांनी 28 डिसेंबर रोजी नामांकन दाखल केले होते. त्यावेळी त्यांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याचे आणि यापूर्वी सक्रिय राजकारणात सहभागी नसल्याचे स्पष्ट केले होते.
BJHM ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मानली जाते आणि बांगलादेशात हिंदुत्वाच्या विचारधारेचा प्रचार करते. ही संघटना देशभरात 350 हून अधिक वैदिक शाळा चालवते, जिथे भगवद्गीता आणि इतर हिंदू ग्रंथांचे शिक्षण दिले जाते. 2023 मध्ये या शाळांबाबत बोलताना गोविंद प्रमाणिक यांनी, “लहान वयापासूनच मुलांमध्ये हिंदू अस्मितेची भावना निर्माण करणे आणि धर्माचे संरक्षण करणे, हाच आमचा उद्देश आहे. बांगलादेशात हिंदू धर्म आज अस्तित्वाच्या संकटाला सामोरा जात आहे,” असे म्हटले होते.
गोविंद प्रमाणिक यांच्याशिवाय आणखी एका हिंदू उमेदवाराचेही नामांकन रद्द झाले आहे. गोनो फोरम या नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळालेले दुलाल बिस्वास यांचे नामांकन कागदपत्रांतील त्रुटींच्या कारणावरून रद्द करण्यात आले. मात्र ते पुन्हा कागदपत्रे सादर करणार आहेत. दुसरीकडे, गोपालगंज-2 मतदारसंघातून अपक्ष हिंदू उमेदवार उत्पल बिस्वास निवडणूक लढवत असून, शेतकरी आणि वंचितांसाठी केलेल्या कामाच्या जोरावर मतदार आपल्याला साथ देतील, असा त्यांचा विश्वास आहे.
बांगलादेशात सध्या राजकीय वातावरण अत्यंत संवेदनशील आहे. शेख हसीना यांची सत्ता 5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर कोसळली आणि त्यांनी राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. त्यानंतर 8 ऑगस्टला नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. सुरुवातीला सहा महिन्यांत निवडणुका घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र नंतर मुदत वाढवण्यात आली आणि आता 12 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणुका होणार आहेत.
शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर BNP ही बांगलादेशातील सर्वात ताकदवान राजकीय शक्ती म्हणून पुढे आली आहे. दीर्घ आजारानंतर 30 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन झाले. सध्या पक्षाची धुरा त्यांचा मुलगा तारिक रहमान यांच्या हाती असून, 17 वर्षांच्या निर्वासनानंतर ते 25 डिसेंबरला बांगलादेशात परतले. त्यांच्या स्वागतासाठी ढाका विमानतळावर सुमारे एक लाख कार्यकर्ते जमले होते. तारिक रहमान यांनी ढाका-17 आणि बोगुरा-6 या दोन मतदारसंघांतून नामांकन दाखल केले असून, ते BNP कडून पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे.
दरम्यान, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचारही वाढताना दिसत आहे. अवघ्या 15 दिवसांत चार हिंदूंची हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 18 डिसेंबर रोजी ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली दीपू चंद्र यांची हत्या झाली. 24 डिसेंबरला अमृत मंडल उर्फ सम्राट यांना जमावाने मारहाण करून ठार केले. त्यानंतर 29 डिसेंबरला मैमनसिंह जिल्ह्यात बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनांदरम्यान अनेक हिंदूंच्या घरांवर हल्ले आणि जाळपोळ झाल्याचेही समोर आले आहे.
