स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीतील सर्व स्थलांतरित इथियोपियाचे होते. ते यमनमार्गे सौदी अरेबियामध्ये रोजगाराच्या शोधात निघाले होते. रविवारी पहाटे अदनच्या आखातात ही बोट उलटली. या भीषण अपघातानंतर आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे, ज्यात नऊ इथियोपियन आणि एक यमनी नागरिक यांचा समावेश आहे.
आफ्रिकेतील लोक यमनसारख्या युद्धग्रस्त देशाचा मार्ग का निवडतात, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे. याचे उत्तर केवळ आर्थिकच नाही, तर सामाजिक आणि राजकीयही आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी यामुळे इथियोपिया आणि सोमालियासारख्या देशांमध्ये असलेले लोक आपला जीव धोक्यात घालून समुद्रामार्गे प्रवास करुन रोजगाराच्या शोधात येतात. आखाती देशांपर्यंत पोहोचण्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला जातो. तिथे चांगल्या संधी मिळतात असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) माहितीनुसार, 2024 मध्ये आतापर्यंत 60,000 हून अधिक स्थलांतरितांनी यमनमार्गे प्रवास केला आहे, तर 2023 मध्ये ही संख्या 97,200 होती. सागरी मार्गांवर सुरक्षा गस्तीत वाढ झाल्यामुळे या संख्येत घट दिसून येत आहे. सागरी मार्गे प्रवास करणं धोकादायक असलं तरीसुद्धा नोकरीसाठी हे लोक आपला जीव धोक्यात घालत आहे.
सागरी मार्गाने नोकरीच्या शोधात जात असताना 154 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली आहे. त्यापैकी 74 लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.
