बसचा चालक, बाईकस्वारासह 71 जणांचा या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. यामध्ये 17 मुलं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात मंगळवारी एक अत्यंत भीषण रस्ते अपघात झाला आहे. इराणमधून परत आलेल्या अफगाण नागरिकांना घेऊन जाणाऱ्या एका प्रवासी बसची, एका मोटरसायकलला आणि त्यानंतर इंधन भरलेल्या टँकरला जोरदार धडकली. या धडकेनंतर बसने पेट घेतला, 71 जणांचा मृत्यू झाला.
advertisement
ही हृदयद्रावक घटना हेरात शहराबाहेरील गुजारा जिल्ह्यात घडली. बसमधील प्रवासी नुकतेच इराणमधून परत आले होते. ते 'इस्लाम कला बॉर्डर क्रॉसिंग' येथून काबूलच्या दिशेने जात होते. या भीषण अपघातात 71 लोकांचा जीव गेला, ज्यात 17 लहान मुलांचा समावेश आहे. टँकर चालक आणि बाईकचालक या दोघांचाही या अपघाता मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात फक्त तीनच व्यक्ती जिवंत बचावल्या आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमुळे आणि धडकेमुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले होते. अशा प्रकारे मोठ्या संख्येने लोकांचा जीव गेल्यामुळे, हा अपघात अफगाणिस्तानच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटनांपैकी एक मानला जात आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
