सौदी अरेबियामध्ये उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात झाला. मदीनाजवळ डिझेल टँकरला बसची धडक बसल्याने, झालेल्या भीषण अपघातानंतर आग लागली आणि बस आगीचा गोळाच बनली. यामध्ये ४२ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, मरण पावलेले बहुसंख्य यात्रेकरू भारतीय नागरिक आणि त्यातही हैदराबादमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
ही बस मक्काहून मदीनाकडे जात असताना भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा १.३० वाजता मुफ्रिहाटजवळ हा अपघात झाला. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अपघाताच्या वेळी बसमधील अनेक प्रवासी झोपलेले होते, त्यामुळे त्यांना बसमधून बाहेर पडण्याची किंवा स्वतःचा वाचवण्याची संधी मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये तेलंगणातील हैदराबाद येथील सर्वाधिक प्रवासी असल्याचे वृत्त 'खलीज टाइम्स'ने दिले आहे.
मृत्यू झालेल्या ४२ लोकांमध्ये ११ महिला आणि १० लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र सौदी अरेबियातील अधिकारी सध्या मृतांच्या नेमक्या संख्येची आणि त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.या घटनेनंतर तेलंगणा सरकारने तातडीने सूत्रे हलवली आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांना रियाधमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी त्वरित समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही रियाधमधील भारतीय दूतावासाचे उप-मिशन प्रमुख (DCM) अबू मथेन जॉर्ज यांच्याशी संपर्क साधला असून, दूतावासाकडून अपघाताची माहिती गोळा केली जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
