या प्रकरणात एका पाळीव मांजरीला 10 मिनिटांहून अधिक काळ चालत्या वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये अडकून राहावे लागले. हा प्रकार खरोखर खूपच विचित्र आहे. काय घडलं, कसं घडलं? चला सविस्तर जाणून घेऊ.
ही घटना 5 डिसेंबर रोजी घडली, जेव्हा जिनतियाओ (Jintiao) नावाच्या मांजरीच्या मालकिणीने घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ इतका थरारक होता की, तो पाहताच व्हायरल झाला आणि मांजरीच्या मालकिणीला प्राण्यांशी गैरवर्तन (Animal Abuse) केल्याबद्दल सोशल मीडियावर ट्रोलिगला सामोरं जावं लागलं.
advertisement
नेमके काय घडलं वॉशिंग मशीनमध्ये?
जिनतियाओची मालकीण धुण्यासाठी कपडे काढत असताना तिची मांजर वॉशिंग मशीनच्या आत कधी गेली, हे तिच्या लक्षात आले नाही. तिने ती मशिन अशीच सुरु केली. काही वेळाने तिच्या लक्षात आले की घरात मांजर नाही आणि मग ते तिला वॉशिंग मशिनच्या आत दिसले, त्यानंतर ती हादरुनच गेली. तिने मशिन बंद केली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिने मशिन सुरु करुन 10 मिनिट झाली होती, म्हणजे मांजर तेव्हापासून वॉशिंग मशिनमध्ये आहे आणि कपड्यांसोबत गोलगोल फिरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, मशीनमधून बाहेर काढल्यावर ती मांजर पूर्णपणे भिजलेली आहे आणि भीतीने जोरजोरात थरथरत आहे. ती धडपडत, अडखळत आपल्या मालकिणीकडे येताना दिसत आहे आणि तिचे नाक लाल झाले आहे. मालकिणीने सांगितले की, तिला मांजरला नेमकी किती इजा झाली आहे हे कळले नाही, त्यामुळे तिला स्पर्श करायची हिम्मत झाली नाही.
सुदैवाने, इतका मोठा अपघात होऊनही जिनतियाओला गंभीर दुखापत झाली नाही. घटनेनंतर दोन दिवसांनी मालकिणीने एक दुसरा व्हिडिओ शेअर केला, ज्यात मांजर पूर्वीसारखीच उत्साहाने खेळताना दिसत होती. तिला फक्त पंजामध्ये (Paws) किरकोळ दुखापत झाली होती, जी पुसल्यानंतर आणि वाळवल्यानंतर (Drying) बरी झाली.
या संपूर्ण प्रसंगामुळे मांजरीच्या मालकिणीने हा धडा घेतला आहे की, यापुढे वॉशिंग मशीन वापरताना त्या विशेष काळजी घेतील.
पाळीव प्राण्यांसाठी धोक्याची घंटा
मांजर वॉशिंग मशीनमध्ये अडकण्याची ही पहिलीच घटना नाही. अनेकदा लहान मुले किंवा पाळीव प्राणी खेळताना, उत्सुकतेपोटी मशीनमध्ये प्रवेश करतात.
यापूर्वी ऑगस्टमध्ये जिआंग्सूमध्येच एका महिलेची मांजर 15 मिनिटे वॉशिंग मशीनमध्ये अडकली होती आणि ती बरी होईपर्यंत मालकिणीला सतत तिच्यावर लक्ष ठेवावे लागले.
तर शेडोंग प्रांतातील एका मांजरीला वॉशिंग मशीनमध्ये अडकल्यानंतर यकृत आणि हृदयाशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
या घटना आपल्याला पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित करतात. मशीनचा दरवाजा बंद करण्यापूर्वी किंवा ऑन करण्यापूर्वी आत कोणी अडकले नाही, याची खात्री करणे हे प्रत्येक पाळीव प्राणी मालकाचे कर्तव्य आहे.
