बीजिंग: चीनने हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानात नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. चीनने विकसित केलेल्या सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव्ह ट्रेनने अवघ्या दोन सेकंदांत तब्बल 700 किमी प्रतितास वेग गाठला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान मॅग्लेव्ह ट्रेनचा यशस्वी प्रयोग मानला जात आहे.
advertisement
हा प्रयोग चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी केला. सुमारे 1,000 किलो वजनाच्या मॅग्नेटिक लेव्हिटेशन वाहनाला इतक्या प्रचंड वेगाने धाववण्यात आले. हा प्रयोग 400 मीटर लांबीच्या मॅग्लेव्ह ट्रॅकवर करण्यात आला. वेग गाठल्यानंतर ट्रेनला सुरक्षितपणे थांबवण्यातही आले, त्यामुळे हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरला. यामुळे ही ट्रेन आतापर्यंत चाचणी घेण्यात आलेली सर्वात वेगवान सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव्ह ट्रेन ठरली आहे.
या चाचणीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात ट्रेन चांदीसारख्या चमकदार झळाळीत क्षणात पुढे जाताना दिसते. मागे हलकी धुरकट वाफ राहते आणि हा सारा प्रकार एखाद्या साय-फाय चित्रपटातील दृश्यासारखा वाटतो.
ही ट्रेन अतिशय शक्तिशाली सुपरकंडक्टिंग मॅग्नेट्सच्या मदतीने ट्रॅकच्या वर हवेत तरंगते. त्यामुळे ट्रेनचा रुळांशी थेट संपर्क राहत नाही आणि घर्षण पूर्णपणे टळते. त्यामुळे इतका प्रचंड वेग शक्य होतो. या प्रयोगात वापरण्यात आलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक अॅक्सिलरेशन सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की, सैद्धांतिकदृष्ट्या ती रॉकेट प्रक्षेपणासाठीही वापरता येऊ शकते, असे संशोधक सांगतात.
इतक्या वेगाने धावणारी ही तंत्रज्ञान प्रणाली भविष्यात दूरच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ काही मिनिटांतच कमी करू शकते. तसेच ही प्रणाली हायपरलूपसारख्या भविष्यातील वाहतूक संकल्पनांसाठीही महत्त्वाची ठरू शकते. जिथे ट्रेन कमी दाबाच्या किंवा व्हॅक्युम ट्यूबमधून अतिवेगाने प्रवास करते.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर ली जीए यांनी सांगितले की, हा यशस्वी प्रयोग चीनच्या अतिवेगवान मॅग्लेव्ह वाहतूक प्रणालीवरील संशोधन आणि विकासाला मोठी चालना देणारा ठरणार आहे.
या प्रकल्पावर संशोधन करणारी टीम गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. याच ट्रॅकवर यावर्षी जानेवारी महिन्यात 648 किमी प्रतितास वेगाचा प्रयोगही यशस्वी झाला होता. तसेच जवळपास 30 वर्षांपूर्वी याच विद्यापीठाने चीनची पहिली मानवी प्रवासासाठीची सिंगल-बोगी मॅग्लेव्ह ट्रेन विकसित केली होती. त्यामुळे मॅग्लेव्ह तंत्रज्ञान आत्मसात करणारा चीन हा जगातील तिसरा देश ठरला होता.
