कॅबिनेटमध्ये फेरबदलाचे संकेत
नुकतेच ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांना पदावरून हटवल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये बदलांचे वारे वाहू लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प आपल्या मंत्रिमंडळात मोठ्या स्तरावर फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या पाच आठवड्यांपासून इराणसोबत सुरू असलेले युद्ध ट्रम्प यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महागात पडताना दिसत आहे. अमेरिकेतील सर्वसामान्यांमध्ये या युद्धामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
advertisement
महागाईचा भडका आणि ढासळती लोकप्रियता
युद्धामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाईने उच्चांक गाठला आहे. याचा थेट फटका ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला बसला आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प यांचे 'अॅप्रूवल रेटिंग' घसरून ३६ टक्क्यांवर आले आहे, जे त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळातील नीचांकी स्तर आहे. ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेले संबोधनही जनतेवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याचे अमेरिकन प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.
तुळसी गॅबार्ड आणि हॉवर्ड लुटनिक रडारवर?
राष्ट्राध्यक्षांच्या टीममधील काही बड्या नावांवर आता टांगती तलवार आहे. नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुळसी गॅबार्ड यांच्या कामावर ट्रम्प नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या पर्यायाचा शोधही सुरू झाला आहे. तसेच वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक हे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपल्या पहिल्या कार्यकाळात सतत स्टाफ बदलल्यामुळे झालेल्या टीकेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रम्प यावेळी "लहान पण परिणामकारक" बदलांची रणनीती आखत आहेत.
६० टक्के अमेरिकन नागरिकांचा युद्धाला विरोध
केवळ सरकारमध्येच नाही, तर रस्त्यावरही ट्रम्प यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील जवळपास ६० टक्के जनता या युद्धाच्या विरोधात आहे. "लोक तुमची विचारधारा काही प्रमाणात सहन करू शकतात, पण खिशाला बसणारी कात्री (पेट्रोलचे दर) सहन करत नाहीत," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
ट्रम्प सध्या दुहेरी कात्रीत अडकले आहेत. एकीकडे इराणचे संकट आणि दुसरीकडे देशांतर्गत ढासळलेली प्रतिमा सावरण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते.
