एकडीकडे H1B व्हिसाचे नियम कठोर केले तर दुसरीकडे गोल्ड व्हिसा नावाने नवीन व्हिसा जाहीर केला. त्याचे अटी आणि नियम देखील सांगितले आहेत. ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड, प्लॅटिनम कार्ड आणि ट्रम्प कॉर्पोरेट गोल्ड कार्ड असे तीन नवीन व्हिसा लाँच केले आहेत. या सर्व कार्डधारकांना अमेरिकेमध्ये अतिरिक्त सुविधा मिळतील, पण त्यासाठी अर्ज करताना मोठी रक्कम भरावी लागेल. या कार्यक्रमातून देशाला मोठ्या प्रमाणात निधी गोळा करता येईल, असे ट्रम्प म्हणाले.
advertisement
नवीन योजनांची वैशिष्ट्ये काय आहेत?
गोल्ड कार्ड योजना: या योजनेअंतर्गत कोणताही परदेशी नागरिक 10 लाख डॉलर देऊन अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची परवानगी झटपट मिळवू शकतो. यासाठी 15,000 डॉलर प्रक्रिया शुल्क आणि पार्श्वभूमी तपासणी नियमांचे पालन करावे लागेल. कंपन्याही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 20 लाख डॉलरचे योगदान देऊन व्हिसा प्रक्रिया जलद करू शकतात.
प्लॅटिनम कार्ड योजना: यासाठी 50 लाख डॉलर (सुमारे 41.5 कोटी रुपये) भरावे लागतील. प्लॅटिनम कार्डधारकांना वर्षातून 270 दिवस अमेरिकेत राहता येईल आणि त्यांच्या परदेशातील उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.
ट्रम्प कॉर्पोरेट गोल्ड कार्ड: हे कार्ड खास कंपन्यांसाठी आहे, ज्यांना परदेशी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज करायचा आहे. यासाठी कंपन्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी 20 लाख डॉलरची गुंतवणूक करावी लागेल. स्पॉन्सरशिप संपल्यावर कंपनी हे कार्ड दुसऱ्या कर्मचाऱ्यासाठी वापरू शकते. अमेरिकेच्या सरकारने स्पष्ट केलं की, गोल्ड कार्ड सध्याच्या EB-1 आणि EB-2 व्हिसाची जागा घेईल. तसेच, हे लागू झाल्यानंतर एका महिन्याच्या आत इतर ग्रीन कार्ड श्रेण्या निलंबित केल्या जाऊ शकतात, असेही संकेत देण्यात आले आहेत.