वॉशिंग्टन: काही महिन्यांपूर्वी शांततेच्या नोबल पुरस्कारावर दाव करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पहाटे खळबळजनक कारवाई करत संपूर्ण जगाला धक्का दिला. अमेरिकेने शनिवारी व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणावर लष्करी हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने फक्त व्हेनेझुएलावर हल्ला केला नाही तर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी यांना ताब्यात घेऊन देशाबाहेर नेण्यात आल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. मात्र या दाव्यांना अद्याप कोणतीही स्वतंत्र अधिकृत दुजोरा मिळालेली नाही.
advertisement
ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, ही कारवाई अमेरिकेच्या कायदा अंमलबजावणी संस्थांच्या समन्वयाने करण्यात आली. या मोहिमेबाबत अधिक माहिती देण्यासाठी फ्लोरिडामधील मार-ए-लागो येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अमेरिकेने व्हेनेझुएला आणि त्याचा नेता राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरोधात यशस्वीपणे मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन देशाबाहेर हलवण्यात आले आहे. ही कारवाई अमेरिकेच्या कायदा अंमलबजावणी संस्थांच्या सहकार्याने करण्यात आली, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान शनिवारी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी कराकासच्या काही भागांमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे AFP आणि Associated Press या वृत्तसंस्थांच्या पत्रकारांनी कळवले आहे. स्फोटांसोबतच कमी उंचीवरून विमाने उडताना दिसल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
AFP च्या वृत्तानुसार स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे 2 वाजता (0600 GMT) स्फोटांचे आवाज ऐकू आले. Associated Press च्या एका पत्रकाराने किमान सात स्फोट झाल्याचे सांगितले असून, राजधानीतील अनेक परिसरांवरून विमाने कमी उंचीवरून जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यानंतर Fox News आणि CBS News या अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प प्रशासनातील नाव न सांगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने कराकासवर झालेल्या हल्ल्यामागे अमेरिकन लष्कर असल्याची माहिती दिली आहे.
या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी The New York Times शी थोडक्यात फोनवर संवाद साधताना या संपूर्ण मोहिमेचे वर्णन “अतिशय यशस्वी” आणि “अचूक नियोजनाचे फलित” असे केले. “यामागे उत्कृष्ट नियोजन, अत्यंत सक्षम सैन्य आणि समर्पित लोकांचा सहभाग होता,” असे ट्रम्प यांनी सांगितल्याचे वृत्तपत्राने नमूद केले.
लॅटिन अमेरिकेत अमेरिकेने थेट लष्करी हस्तक्षेप करण्याची ही घटना असल्यास, ती 1989 मध्ये पनामा येथे केलेल्या आक्रमणानंतरची पहिली ठरेल. त्या कारवाईत तत्कालीन लष्करी शासक मॅन्युएल नोरीएगाला अटक करण्यात आली होती.
ट्रम्प यांच्या दाव्यांबाबत व्हेनेझुएला सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा त्याला दुजोरा मिळालेली नाही.
वॉशिंग्टनने यापूर्वी मादुरो सरकारवर “नार्को-स्टेट” चालवत असल्याचा आणि निवडणुकांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. 2013 मध्ये ह्यूगो चाव्हेझ यांच्या निधनानंतर सत्तेवर आलेल्या मादुरो यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत अमेरिका जगातील सर्वात मोठ्या सिद्ध तेलसाठ्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट येण्याच्या काही वेळ आधीच व्हेनेझुएलाचे संरक्षण मंत्री व्लादिमीर पाद्रीनो यांनी एका व्हिडिओ संदेशात देशात परकीय सैन्याच्या उपस्थितीला विरोध केला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यांनी पहाटे झालेल्या अमेरिकन हल्ल्यात नागरी भागांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केला असून, मृत आणि जखमी झालेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचेही सांगितले आहे.
