येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचंही त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं. आधी टॅरिफवरुन भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव होता. मात्र पीएम मोदीं यांनी संयम ठेवून रशिया, चीन यांच्यासोबत व्यापार करारावर चर्चा सुरू केल्यानंतर अमेरिकेनं नरमाईची भूमिका घेतली. साम-दाम-दंड या तिन्हीचा वापर करुनही भारत झुकत नाही हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेनं भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याची रेघ ओढली.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी, भारत आणि अमेरिका व्यापारविषयक अडथळे दूर करण्यासाठी चर्चा करत आहेत, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे, असं म्हटलं. मी लवकरच माझे खूप चांगले मित्र, पंतप्रधान मोदी यांच्याशी येत्या काही आठवड्यांत चर्चा करण्यास उत्सुक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, दोन्ही देशांच्या चर्चेतून काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी शनिवारी ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंध खास असल्याचे म्हटलं होतं आणि मोदींसोबतच्या आपल्या मैत्रीवर जोर दिला होता. मात्र, त्याच वेळी त्यांनी, मोदी सध्या जे करत आहेत, ते मला आवडलेले नाही, असंही विधान केलं होतं. त्यावर, पंतप्रधान मोदींनीही ट्रम्प यांच्या सकारात्मक भावनांची प्रशंसा केली होती आणि दोन्ही देशांमध्ये व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचे म्हटले होतं.
डोनाल्ड ट्रम्प खरंच नरमाईची भूमिका ज्याप्रमाणे सोशल मीडियावर घेतात त्याच प्रमाणे प्रत्यक्षात वागतील का की पुन्हा यूटर्न घेतील याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या वक्यव्यांवरुन इतके यूटर्न घेतले आहेत की हा नवा डाव तर नाही ना अशी कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात हे चित्र अधिक स्पष्ट होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.