बर्न: स्वित्झर्लंडमधील क्रान्स-मोंटाना (Crans-Montana) या प्रसिद्ध स्की रिसॉर्ट शहरात नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान एका बारमध्ये लागलेल्या भीषण आगीत डझनभर लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही आग ‘ले कॉन्स्टेलेशन’ (Le Constellation) नावाच्या बारमध्ये लागली असल्याचे स्विस पोलिसांनी गुरुवारी पहाटे सांगितले. आगीतील मृतांची संख्या 40 इतकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र पोलिसांकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
advertisement
स्वित्झर्लंडच्या दक्षिण-पश्चिमेकडील वालिस (Wallis) कॅन्टनमधील पोलिस प्रवक्ते गाएतान लाथिओन यांनी सांगितले, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे.
ही आग 1 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 1.30 वाजता (GMT 00:30) लागली. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बारमध्ये मोठी गर्दी जमली होती. मात्र या दुर्घटनेत नेमके किती लोकांचा मृत्यू झाला याची अचूक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
‘बारमध्ये 100 हून अधिक लोक उपस्थित होते’
पोलिस प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, बहुतेक मृत आणि जखमी हे पर्यटक असल्याचा अंदाज आहे. जे सुट्टीसाठी क्रान्स-मोंटाना येथे आले होते. घटनेच्या वेळी बारमध्ये 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, तपासाची सुरुवात नुकतीच झाली आहे. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध स्की रिसॉर्ट असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.
स्विस दैनिक ब्लिक (Blick)ने घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका डॉक्टरच्या हवाल्याने सांगितले की, मृतांचा आकडा डझनांच्या घरात असू शकतो. तर स्थानिक वृत्तपत्र ले नुव्हेलिस्ते (Le Nouvelliste)ने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या दुर्घटनेत सुमारे 40 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाले आहेत.
घटनेनंतर पोलिस, अग्निशमन दल आणि अनेक हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले. मृत आणि जखमींच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसर बंद करण्यात आला असून क्रान्स-मोंटानावर नो-फ्लाय झोन लागू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी निवेदनात सांगितले.
काही स्विस माध्यमांनी सांगितले की, बारमध्ये सुरू असलेल्या एका कॉन्सर्टदरम्यान पायरोटेक्निक्स (फटाक्यांसारख्या विशेष प्रकाशयोजना) वापरल्यामुळे आग लागली असावी. मात्र पोलिसांनी आगीचे नेमके कारण अद्याप अज्ञात असल्याचे स्पष्ट केले आहे.
क्रान्स-मोंटाना स्की रिसॉर्टबद्दल
क्रान्स-मोंटाना हे आल्प्स पर्वतरांगांमधील वालिस प्रदेशात स्थित असलेले लक्झरी स्की रिसॉर्ट शहर आहे. हे ठिकाण स्वित्झर्लंडची राजधानी बर्नपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. या शहरात 87 मैल लांबीचे स्की ट्रेल्स असून, हे ठिकाण विशेषतः ब्रिटिश पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. बीबीसीच्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरीस येथे FIS वर्ल्ड कप स्पीड स्कीइंग स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
