युद्धाचा फटका जगभरात
या सगळ्याचा परिणाम जगभरात होत आहे. LPG गॅस सिलिंडचा तुटवडा, क्रूड ऑइलचा मर्यादीत साठा यामुळे जगसमोर संकट उभं राहिलं आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जाणारा स्ट्रेट ऑफ होर्मुझ इराणने बंद केल्यामुळे अमेरिका कमालीची आक्रमक झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मंगळवार रात्री ८ वाजेपर्यंतची (भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळपर्यंत) शेवटची संधी दिली आहे. "जर या वेळेत समुद्री मार्ग उघडला नाही, तर इराणमध्ये एकही पॉवर प्लांट किंवा पूल सुरक्षित राहणार नाही," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली धमकी
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अत्यंत आक्रमक भाषेचा वापर केला आहे. त्यांनी म्हटलं की, "मंगळवारचा दिवस इराणसाठी पॉवर प्लांट आणि 'ब्रिज डे' असेल. रस्ता उघडा, नाहीत तर तुमची काही खैर नाही अशी ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. इराणने शहाणपणा दाखवला नाही तर आम्ही सगळं उडवून देऊ आणि तिथल्या तेलावर ताबा मिळवू, असंही ट्रम्प म्हणाले.
इराणनेही ठोकलं शड्डू, ठेवली मोठी अट
दुसरीकडे, इराणने ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक घातलेली नाही. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज उघडण्यासाठी उलट एक अट घातली. युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल केला जाईल आणि त्यातील एक हिस्सा नुकसान भरपाईसाठी वापरला जाईल, तेव्हाच हा मार्ग उघडला जाईल, असं इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
भारताची चिंता का वाढली?
स्ट्रेट ऑफ होर्मुज हा मार्ग भारतासाठी बंद राहिल्यास, चीन आणि जपान सारख्या देशांच्या इंधन सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. इतकच नाही तर परवानगी घेऊन भारताला यातून जाता आलं तरीसुद्धा जास्तीला टोल लावला जाणार असल्याने किंमती वाढण्याची शक्यता आहे. भारताला लागणाऱ्या खनिज तेलाचा मोठा पुरवठा याच मार्गाने होतो. हा मार्ग बंद राहिल्यास भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडू शकतात आणि खतांचा पुरवठाही मर्यादीत होऊ शकतो.
