वॉशिंग्टन: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या ओहायो राज्यातील सिनसिनाटी येथील घरावर घडलेल्या घटनेप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तवाहिनी WLWT 5 ने प्रसारित केलेल्या फुटेजनुसार, घराची किमान एक काच स्पष्टपणे फुटलेली दिसत आहे.
advertisement
या घटनेच्या वेळी जेडी व्हान्स घरात उपस्थित नव्हते. कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही. मात्र संशयिताचा हेतू काय होता. याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडली त्या काळात जेडी व्हान्स हे फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथील त्यांच्या गोल्फ क्लबमध्ये होते. तेथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट घेतली होती. याच दरम्यान अमेरिकेकडून वेनेजुएलावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू होत्या. परिस्थितीवर लक्ष ठेवल्यानंतर व्हान्स नंतर सिनसिनाटीतील आपल्या निवासस्थानी परतले.
फेडरल कायदा अंमलबजावणी संस्थेतील एका अधिकाऱ्याने CNN ला सांगितले की, एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार संशयिताने घरात प्रवेश केलेला नव्हता. तसेच घटनेच्या वेळी व्हान्स कुटुंबीयही घरी नव्हते.
स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये घराच्या खिडक्यांचे नुकसान झाल्याचे दिसते. मात्र काच नेमकी कशामुळे फुटली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
ही घटना जेडी व्हान्स किंवा त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करून घडवण्यात आली होती का, याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
