अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात करार झाला असून दोन्ही देश तेल साठ्यावर एकत्र मिळून काम करतील असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भविष्यात जर पाकिस्तानकडून तेल विकत घ्यायची वेळ आली त्यासाठी कोणतंही आश्चर्य वाटायला नको. ट्रम्प यांच्या या घोषणेने भारताला बाजूला सारलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "आम्ही पाकिस्तानसोबत एक करार केला, दोन्ही देश तेल साठ्यांवर विकासावर एकत्र काम करतील. या भागीदारीचे नेतृत्व करणारी तेल कंपनी आम्ही निवडत आहोत. कोणास ठाऊक, कदाचित पाकिस्तान एके दिवशी भारतालाही तेल विकेल!"
advertisement
दक्षिण कोरियाचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, "आम्ही व्हाईट हाऊसमध्ये व्यापार करारावर काम करण्यात खूप व्यस्त आहोत. मी अनेक देशांच्या नेत्यांशी बोललो आहे. मी आज दुपारी दक्षिण कोरियाच्या व्यापार प्रतिनिधीमंडळाला भेटणार आहे. दक्षिण कोरिया सध्या 25% आयात शुल्कावर आहे, त्यांच्याकडे हे आयात शुल्क कमी करण्याचा एक प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव काय आहे, हे जाणून घेण्यात मला स्वारस्य असेल."
अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केली आहे. 1 ऑगस्टपासून टेरिफ लागू केला जाणार असून त्याचा फटका ऑटो, फार्मा, मोबाईल सेक्टर, ज्वेलरी या सेक्टरला बसणार आहे. एकीकडे भारतासोबत मैत्रीपूर्ण नातं असल्याचं भासवत ट्रम्प यांनी मागच्या दारानं पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचं दिसत आहे. त्यांच्या डिलनंतर जगभरात चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक गोष्टींवरुन संघर्ष सुरू आहेत. हे सगळं माहिती असतानाही अमेरिकेनं मात्र पाकिस्तानसोबत डिल केलं आहे. त्यामुळे भारताला एकीकडे मित्र म्हणायचं तर दुसरीकडे हळूच बाजूला करायचं अशी दुहेरी खेळी ट्रम्प यांनी केली आहे.
