इस्रायलच्या हल्ल्यानंतर, दमास्कसमधील लोक प्रचंड स्फोटांमुळे घाबरले होते. सीरियाच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिले की, हे हल्ले इस्रायलने केले आहेत. यापूर्वी, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इशारा दिला होता की, भयंकर हल्ले केले जातील.
इस्रायलने सीरियावर हल्ला का केला?
दक्षिण सीरियाच्या सुवेदा शहरात सध्या अंतर्गत संघर्ष सुरू आहे. येथील स्थानिक सुरक्षा दल आणि ड्रुझ समुदायाच्या सशस्त्र लोकांसोबत चकमकी सुरू आहेत. याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर इस्रायलने थेट सीरियाच्या सैन्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यापूर्वी, इस्रायलने धमकी दिली होती की जर सीरियाच्या सैन्याने दक्षिण सीरियातील ड्रुझ समुदायावरील हल्ले थांबवले नाहीत, तर ते सीरियाच्या सैन्याचा नाश करतील. दक्षिण सीरियातील सुवेदा शहरात ड्रुझ लोक आणि सीरियन सैन्यात हिंसक संघर्ष सुरू आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले आहेत.
advertisement
मंगळवारी, सीरियातील एका ड्रुझ धार्मिक नेत्याने सांगितलं की तेथील सैन्य त्यांना क्रूर पद्धतीने संपवत आहे. पण यावर सरकारची मात्र वेगळी भूमिका आहे. या हिंसाचारामागे गुन्हेगारी टोळ्यांचा हात असल्याचं सरकारचं मत आहे.
सीरियाच्या नवीन सरकारने म्हटले आहे की, ते अल्पसंख्याकांचे संरक्षण करेल, परंतु लोक घाबरले आहेत. तर इस्रायलने ड्रुझ समुदायाचे संरक्षण करण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच त्यांनी सीमेवरील सीरियन भागात सैन्य पाठवले आहेत. अमेरिकेने देखील दक्षिण सीरियामधील नागरिक आणि अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसाचाराचाही निषेध केला आहे. सीरियासाठी अमेरिकेचे विशेष दूत टॉम बॅरॅक म्हणाले, "आम्ही सुवेदा शहरातील नागरिकांवर होणाऱ्या हिंसाचाराचा स्पष्टपणे निषेध करतो. दोन्बी बाजुने माघार घ्यावी आणि शांततापूर्ण पद्धतीने चर्चा करावी, ज्यामुळे कायमस्वरूपी युद्धबंदी होऊ शकेल."
ड्रुझ कोण आहेत?
ड्रुझ नागरिकांना अरब मानले जाते. या समुदायाची उत्पत्ती ११ व्या शतकात इजिप्तमध्ये झाली. हा समुदाय सीरिया, लेबनॉन, जॉर्डन आणि इस्रायलमध्ये विखुरलेल्या स्थितीत राहतो. त्यांची संख्या सुमारे १० लाख आहे. हा समुदाय इस्लाम किंवा यहुदी धर्म मानत नाही तर वेगळ्या धर्मावर विश्वास ठेवतो. ड्रुझ ज्या धर्मावर विश्वास ठेवतात तो धर्म हिंदू, बौद्ध आणि इतर धर्मांचे मिश्रण आहे.
सीरियामध्ये किती ड्रुझ राहतात?
सीरियामध्ये जवळपास ७ लाख ड्रुझ राहतात. देशातील सर्वाधिक ड्रुझ सुवेदामध्ये राहतात. २९ हजारांहून अधिक ड्रुझ नागरिक सीरियन-व्याप्त गोलान हाइट्समध्ये राहतात. ते स्वतःला सीरियन नागरिक मानतात. इस्रायलने येथील ड्रुझ लोकांना अनेक वेळा इस्रायली नागरिकत्व देऊ केले आहे, जे त्यांनी नाकारले आहे. इस्रायलमध्ये ड्रुझ समुदायाचे सुमारे १,५०,००० नागरिक आहेत, ज्यांनी इस्रायली नागरिकत्व घेतले आहे आणि इस्रायली सैन्यात सेवा दिली आहे.
