कोहिनूर हा जगातील सर्वात महागडा आणि ‘अमूल्य’ मानला जाणारा हिरा. आज हा हिरा ब्रिटिश क्राऊन ज्वेल्सचा भाग आहे. त्याची झळाळी, कट आणि सौंदर्य पाहून अनेक जण मंत्रमुग्ध होतात. मात्र या हिऱ्याच्या इतिहासामागे दडलेली एक काळी बाजू फार कमी लोकांना माहीत आहे, तो म्हणजे कोहिनूरचा शाप होय
advertisement
सुमारे 105.6 कॅरेट वजनाचा हा हिरा फारसी भाषेत “कोह-ए-नूर” म्हणजेच “प्रकाशाचा पर्वत” म्हणून ओळखला जातो. लोककथांनुसार, हा हिरा पुरुष मालकांसाठी दुर्दैव घेऊन येतो, असा समज आहे. कोहिनूर केवळ इतिहासातील एक मौल्यवान रत्न नाही, तर राजघराण्यांमधील विश्वासघात, हत्या, युद्ध आणि सत्ता-संघर्ष यांचा तो साक्षीदार आहे. याच कारणामुळे त्याला ‘शापित हिरा’ असेही म्हटले जाते.
कोहिनूरचा उगम
105.6 कॅरेटच्या या हिऱ्यात दडलेलं दुर्दैव समजून घेण्याआधी, त्याचा उगम पाहूया.
ओडिशा स्टेट आर्काइव्ह्जनुसार, कोहिनूरचा शोध 13व्या शतकात काकतीय राजवटीच्या काळात गोलकोंडा प्रदेशातील कोल्लूर खाणींमध्ये लागला. हा प्रदेश आजच्या तेलंगणामध्ये येतो.
असाधारण पारदर्शकता, प्रकाश अडकवणारा वेगळा रंग, परिपूर्ण स्फटिक रचना आणि प्रचंड आकार या सर्व गुणांमुळे कोहिनूर नेहमीच त्याच्या मालकांसाठी गर्व, लालसा आणि अहंकाराचं कारण ठरला. हा हिरा हिंदू, अफगाण, फारसी, मंगोल आणि शीख राजांमध्ये फिरत राहिला. त्यासाठी रक्तरंजित युद्धं झाली. या राजांच्या आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट समान दिसते हिंसा, विश्वासघात, छळ आणि हत्या.
कोहिनूरचा शाप
इतिहासात राजे भूमी, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, सिंहासन, स्त्रिया, ओळख आणि धर्मासाठी लढले. मात्र एखाद्या दागिन्यासाठी अशी क्रूरता क्वचितच पाहायला मिळते. कोहिनूरबाबत मात्र असा समज आहे की तो आपल्या पुरुष मालकांसाठी संकट घेऊन आला. तो युद्धाचं कारण नसला, तरी ज्यांच्या ताब्यात तो गेला, त्यांना दुर्दैवाने घेरले.
1290 च्या दशकात अलाउद्दीन खिलजीने दिल्ली सल्तनतीचं सिंहासन मिळवण्यासाठी आपल्या काका सुलतान जलालुद्दीन यांची हत्या केली. पुढे दक्षिण भारतातील मोहिमांदरम्यान त्याने कोहिनूर मिळवला.
मुघल बादशाह शाहजहानच्या मयूर सिंहासनात कोहिनूर जडवलेला होता. मात्र त्याच्यावर त्याचा मुलगा औरंगजेब याने विश्वासघात केला आणि शाहजहानला आयुष्याची शेवटची वर्षे आग्रा किल्ल्यात कैदेत काढावी लागली.
1739 मध्ये इराणच्या अफशारिद वंशाचा संस्थापक नादिरशाह एका पगडीच्या अदलाबदलीतून मुघल सम्राट मुहम्मद शाहकडून कोहिनूर मिळवतो. दिल्लीतील काही सैनिक मारले गेल्याची अफवा पसरताच नादिरशाहने दिल्लीमध्ये भीषण कत्तल घडवून आणली. अवघ्या 9 तासांत सुमारे 30,000 लोक मारले गेले.
1747 मध्ये नादिरशाहची हत्या झाली. कोहिनूर त्याच्या नातवाकडे शाहरुख शाहकडे गेला. मात्र 1796 मध्ये आघा मोहम्मद खान कजार याने शाहरुख शाहची हत्या केली.
यानंतर शाह शुजा दुर्रानीकडे कोहिनूर आला. तो हा हिरा बांगडीत घालत असे. मात्र स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याला हा हिरा महाराजा रणजितसिंह यांना द्यावा लागला.
1839 मध्ये महाराजा रणजितसिंह यांचे निधन झाले. त्यानंतर हा हिरा त्यांचा मुलगा खडकसिंह याच्याकडे गेला, ज्याचा तुरुंगात विष देऊन मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. त्याचा मुलगा निहालसिंह रहस्यमयरीत्या मरण पावला.
यानंतर शीख साम्राज्याचा शेवटचा महाराजा दलीपसिंह याला कोहिनूर मिळाला. तो केवळ 10 वर्षांचा असताना पण 1849 मध्ये ब्रिटिश राजवटीने शीख साम्राज्य ताब्यात घेतले. ‘लास्ट ट्रीटी ऑफ लाहोर’वर महाराजा दलीपसिंहची सही झाली आणि कोहिनूर राणी व्हिक्टोरियाला भेट म्हणून देण्यात आला.
1857 च्या उठावाने ईस्ट इंडिया कंपनी हादरली होती. ब्रिटिशांना कोहिनूरच्या शापाची भीती वाटत असल्याने त्यांनी कधीही कोणत्याही पुरुष वारसाला हा हिरा घालू दिला नाही.
ब्रिटिश राजघराण्यात कोहिनूर केवळ महिलांनीच परिधान केला. त्यामध्ये राणी व्हिक्टोरिया, राणी अलेक्झांड्रा, क्वीन मदर एलिझाबेथ बोव्स-लायन आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा समावेश आहे.
आजही कोहिनूर भारतात परत आणण्याची मागणी होत आहे. ब्रिटनमध्ये त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत. मात्र सध्या हा हिरा लंडनमधील टॉवर ऑफ लंडन येथील ‘ज्वेल हाऊस’मध्ये सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे आणि आजही तो पाहणाऱ्यांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.
