प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचं रुपांतर अचानक आगीच्या गोळ्यात झालं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये विमानातून धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसत आहेत. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांमध्येच तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे विमानाचं नियंत्रण सुटलं आणि धावपट्टीजवळ मोठा आवाज झाला.
अपघातानंतर बचावकार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच एसेक्स पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. विमानात किती लोक होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाकडून मृतांची संख्या निश्चित केली जात आहे.
advertisement
एसेक्स पोलिसांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'साउथेंड विमानतळावर विमान अपघात झाला आहे. आमच्या आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत'.
या अपघाताचे कारण सध्या कळू शकलेले नाही, पण सुरुवातीच्या अंदाजानुसार, हा तांत्रिक बिघाड किंवा इंजिनमध्ये बिघाड असू शकतो. विमानतळ अधिकाऱ्यांनी सध्या धावपट्टी बंद केली आहे आणि सर्व उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत, तसंच तपास सुरू करण्यात आला आहे.
प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि विमानतळाच्या वेबसाइटवर दिल्या जाणाऱ्या अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, आम्ही मोठा आवाज ऐकला आणि विमानाला आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला.
