केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी नेपाळमधल्या नेत्यांवरही हल्ले केले आहेत, तसंच त्यांची घरंही जाळली आहेत. एवढच नाही तर नेपाळचं संसद भवन आणि सुप्रीम कोर्टालाही आग लावण्यात आली आहे.
नेपाळमध्ये कसं सुरू झालं आंदोलन?
नेपाळमध्ये हे आंदोलन सोशल मीडियावर सरकारने प्रतिबंध आणल्यामुळे सुरू झालं. पण आंदोलनाचं मुख्य कारण भ्रष्टाचार असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण देश बर्बाद झाला आहे. नेते आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला सगळं काही मिळत आहे, पण सामान्य जनता त्यांच्या हक्कापासून वंचित आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. देशातली न्यायालयही यात काही करू शकत नाहीत, कारण ते सरकारच्या दबावात आहेत, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे. सोमवारी रात्री ओली सरकारने सोशल मीडियावरील प्रतिबंध हटवले, पण अजूनही आंदोलकांचा राग शांत झालेला नाही.
advertisement
अमेरिका-चीनच्या लढाईत नेपाळचा बळी?
नेपाळमध्ये अचानक सुरू झालेल्या या उलथापालथीनंतर बऱ्याच शंका निर्माण झाल्या आहेत. फक्त सोशल मीडियावर प्रतिबंध टाकल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटू शकतं का? यामागे कुठल्या परदेशी ताकदीचा हात आहे का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. नेपाळ मागच्या दोन दशकांपासून चीन आणि अमेरिकेमधल्या शीत युद्धाचं मैदान झालं आहे. नेपाळमध्ये लोकशाही लागू झाल्यानंतर आलेली बहुतेक सरकारं ही चीन समर्थक होती, ज्यांना अमेरिकेने विरोध केला. त्यामुळे अमेरिकेने आपल्या पसंतीचं सरकार स्थापन करण्यासाठी नेपाळमध्ये हस्तक्षेप केला का? अशा चर्चा सुरू आहेत.
नेपाळमध्ये बांगलादेश-श्रीलंका पॅटर्न
नेपाळमधल्या या आंदोलनाचा पॅटर्न 2024 साली बांगलादेशमध्ये आणि 2022 साली श्रीलंकेमध्येही दिसला होता. या दोन्ही देशांमध्ये स्थानिक मुद्द्यांवरून आक्रोश झाला आणि जनता रस्त्यावर उतरली. नेपाळप्रमाणेच या देशांमध्येही तरुणांच्या नेतृत्वात आंदोलनं सुरू झाली आणि त्यांनी नेत्यांच्या घरांवर हल्ले आणि जाळपोळ केली. आंदोलकांनी नेत्यांची घरं लुटणं, फर्निचर तोडणं, घरांना आग लावणं अशी दृष्यं बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये पाहायला मिळाली. या आंदोलनांमुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांना देश सोडून पळून जावं लागलं.
नेपाळमधल्या आंदोलनातही बाहेरच्या शक्ती?
नेपाळमधल्या या आंदोलनामागेही बाहेरच्या शक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागच्या काही महिन्यांपासून नेपाळमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. 2008 साली नेपाळमध्ये लोकशाही आल्यानंतर सत्ता ओली, माओवादी सेंटरचे पुष्प कमल दहल प्रचंड आणि पाच वेळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी आळीपाळीने उपभोगली. ओली चारवेळा नेपाळचे पंतप्रधान झाले, पण त्यांना कधीही स्वत:चा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. ओली यांन चीन समर्थक मानलं जातं. 3 सप्टेंबरला चीनमध्ये झालेल्या मिलट्री परेडमध्येही ओली पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसंच त्यांनी एससीओ शिखर संमेलनामध्येही भाग घेतला आणि चीनचे प्रमुख शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेतली.