अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत मारले गेलेले सर्व खेळाडू क्लब-स्तरीय क्रिकेटपटू होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी टोलो न्यूजला सांगितले की, अफगाणिस्तानातील पक्तिका येथे पाकिस्तानी हवाई हल्ल्यात आठ क्लब-स्तरीय क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. तर इतर चार जखमी झाले. हे खेळाडू पक्तिकाच्या मध्यभागी असलेल्या शराणा येथून त्यांच्या सामन्यानंतर अर्गुन जिल्ह्यात परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
advertisement
बोर्डाने काय म्हटले?
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये क्रिकेटपटूंना श्रद्धांजली वाहिली. ज्यात बोर्डाने लिहिलं की, "शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानी लष्कराने केलेल्या भ्याड हल्ल्यात लक्ष्य झालेल्या पक्तिका प्रांतातील क्रिकेटपटूंच्या दुःखद निधनाबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तीव्र दुःख व्यक्त करतो."
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
पाकिस्तानच्या कृतींना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्ताननेही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. भारताप्रमाणेच, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की या दुःखद घटनेनंतर आणि पीडितांच्या आदरार्थ, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या पाकिस्तानसोबतच्या आगामी त्रिकोणीय टी-२० मालिकेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
युद्धबंदी असूनही हवाई हल्ला
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील ४८ तासांच्या युद्धबंदी दरम्यान हा हल्ला झाला. पाकिस्तानने बुधवारी सांगितले होते की अफगाणिस्तानसोबत ४८ तासांच्या युद्धबंदीवर सहमती झाली आहे. दोन्ही देशांमधील सीमा संघर्षांदरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर युद्धसदृश परिस्थिती आहे.