पाकिस्तान अमेरिका आणि चीनच्या पाठबळावर कितीही बढाया मारत असला, तरी प्रत्यक्षात त्याला वारंवार आंतरराष्ट्रीय पातळीवर नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमधील अनेक नागरिक सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसारख्या मध्य-पूर्वेतील श्रीमंत इस्लामिक देशांमध्ये जाऊन भीक मागताना आढळत आहेत. या प्रकारामुळे या देशांनी वारंवार इशारे देऊनही पाकिस्तान आपल्या भिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेला दिसतो. अलीकडेच सौदी अरेबियाने भीक मागण्याच्या आरोपाखाली तब्बल 56 हजार पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर हाकलून दिले आहे.
advertisement
सौदी अरेबिया आणि यूएई यांनी पाकिस्तानला वारंवार इशारा दिला आहे की त्यांनी आपल्या भिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तान सरकारने हजारो नागरिकांना ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले आहे. याचा अर्थ असे नागरिक आता परदेशात जाऊ शकणार नाहीत. विविध अहवालांनुसार, संघटित पद्धतीने भीक मागणाऱ्या टोळ्यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) ने 2025 मध्ये तब्बल 66,154 प्रवाशांना विमानप्रवास करण्यापासून रोखले आहे.
गेल्या महिन्यातच यूएईने बहुसंख्य पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे थांबवले होते. कारण पाकिस्तानी नागरिक खाडी देशांमध्ये जाऊन गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होत असल्याचे आणि भीक मागत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत होते. त्यामुळेच यूएईने हे कठोर पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.
पाकिस्तानने हजारो नागरिकांना ‘एक्झिट कंट्रोल लिस्ट’ (ECL) म्हणजेच नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकल्याचे आकडे पाकिस्तानी संसदेमधील नॅशनल असेंब्लीच्या एका समितीने जाहीर केले होते. याआधीच सौदी अरेबियाने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की उमराह व्हिसाचा गैरवापर करून मक्का आणि मदीना येथे जाऊन भीक मागणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.
पाकिस्तानमध्ये अनेक संघटित टोळ्या उमराह व्हिसाच्या माध्यमातून भिकाऱ्यांना सौदी अरेबिया, यूएईसारख्या देशांत पाठवतात. केवळ भीक मागणेच नव्हे, तर काही पाकिस्तानी नागरिक खाडी देशांमध्ये गुन्हेगारी कृत्यांमध्येही सहभागी असल्याचे उघड झाले आहे. याचा परिणाम असा झाला आहे की प्रामाणिक पाकिस्तानी तीर्थयात्री, कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. सौदी अरेबिया आणि यूएईसारखे देश आता पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देताना अधिक कडक तपासणी करू लागले आहेत.
पाकिस्तानच्या FIA चे प्रमुख रिफ्फत मुख्तार यांनी कराचीस्थित ‘द न्यूज इंटरनॅशनल’ या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “अलीकडेच सौदी अरेबियातून संघटित भीक मागण्यात सहभागी असलेल्या 56 हजार पाकिस्तानी नागरिकांना निर्वासित करण्यात आले आहे.” तर ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या अहवालानुसार, FIA ने या वर्षी 66,154 प्रवाशांना विमानातून उतरवून परदेशात जाण्यापासून रोखले आहे. जेणेकरून भीक मागणाऱ्या टोळ्या आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखता येईल.
मुख्तार यांनी पुढे सांगितले की, अवैध स्थलांतर आणि भीक मागण्याच्या नेटवर्कमुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा गंभीररीत्या खराब झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी भिकारी तीर्थयात्रा आणि पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून पश्चिम आशियातील शहरांमध्ये रस्त्यावर भीक मागताना दिसत आहेत. यामुळे यजमान देशांमध्ये चिंता वाढली असून, वैध पाकिस्तानी प्रवाशांसाठी व्हिसा तपासणी अधिक कठोर करण्यात आली आहे.
मक्का आणि मदीना या इस्लामच्या दोन पवित्र स्थळांमध्ये पाकिस्तानी भिकारी दिसत असल्याने अनेक पाकिस्तानी नागरिकांना लाज वाटत असल्याचेही समोर आले आहे. 2024 मध्ये सौदी अरेबियाच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने इशारा दिला होता की परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर याचा परिणाम पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रांवर होऊ शकतो. सौदी अरेबियाच्या रस्त्यांवर पाकिस्तानी भिकाऱ्यांची उपस्थिती सर्वांनाच दिसून येते.
2024 मध्ये इस्लामाबादमधील रहिवासी उस्मान याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले होते की, “मी नुकतीच उमराह करून परतलो असून, पाकिस्तानी असल्याची मला लाज वाटते. ते (पाकिस्तानी भिकारी) बिन दाऊद स्टोअरमध्ये, उमराह दरम्यान आणि रस्त्यांवरही भीक मागत होते.”
विशेष म्हणजे यातील अनेक भिकारी हे व्यावसायिक पद्धतीने काम करणारे असून, व्हिसा मिळाल्यानंतर ते मुद्दाम पाकिस्तानबाहेर जातात. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात कायदेतज्ज्ञ राफिया जकारिया यांनी याआधीच लिहिले होते की, पाकिस्तानी नागरिकांनी स्वतःच्या देशबांधवांना “मक्का आणि मदीनेच्या पवित्र स्थळांबाहेर तळ ठोकून परदेशी भाविकांकडून पैशांसाठी छळ करताना” पाहिले आहे. त्यांनी या भिकाऱ्यांना ‘मास्टर मॅनिप्युलेटर्स’ असे संबोधले होते, जे लोकांच्या अपराधभावनेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात.
ही समस्या केवळ सौदी अरेबियापुरती मर्यादित नाही. यूएई, कुवेत, अझरबैजान आणि बहारीनसह अनेक पश्चिम आशियाई देशांमध्ये पाकिस्तानी भिकारी आढळून येतात. 2024 मध्ये ओव्हरसीज पाकिस्तानचे सचिव झीशान खानजादा यांनी सांगितले होते की, पश्चिम आशियाई देशांमध्ये अटक करण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी तब्बल 90 टक्के भिकारी पाकिस्तानमधील होते.
यामुळे परदेशात पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाली असून, देशातील नोकरी शोधणाऱ्या नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. भिकाऱ्यांचा हा ‘निर्यात उद्योग’ केवळ सौदी अरेबियासारख्या देशांनाच त्रास देत नाही. तर कायद्याचे पालन करणाऱ्या सामान्य पाकिस्तान्यांसाठीही अडचणी निर्माण करत आहे. त्यांना आता कठोर व्हिसा तपासणी आणि वारंवार व्हिसा नाकारले जाण्याचा सामना करावा लागत आहे.
