रशिया युद्ध संपविण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र रशियाची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोत्परी आहे असं यावेळी पुतीन म्हणाले. दरम्यान मॉस्कोत होणाऱ्या पुढच्या बैठकीसाठी पुतीन यांनी ट्रम्प यांनी निमंत्रण दिलं. तर पुतीन यांच्यासोबत झालेली बैठक सार्थकी ठरलेली असून आम्ही अनेक प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर आहोत असं ट्रम्प म्हणालेत.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ट्रम्प यांची जवळपास ७ वर्षांनी भेट घेतली. अमेरिकेतल्या अलास्कामध्ये पोहोचल्यावर पुतिन यांचं बी2 बॉम्बरनं स्वागत करण्यात आलं. बी2 बॉम्बरकडे अमेरिकेची महाताकद म्हणून पाहिलं जातं. आकाशात या विमानांच्या गडगडाटानं पुतिन यांचं स्वागत करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केला. याच विमानाचा वापर दोन महिन्यांपूर्वी करून इराणचे अणूप्रकल्प अमेरिकेनं उद्ध्वस्त केले होते.
advertisement
अलास्कामध्ये झालेल्या बैठकीत युक्रेनशिवाय कोणताही करार झाला नाही. ट्रम्प थकलेले आणि अस्वस्थ दिसत होते, कदाचित पुतिन यांनी युद्धाच्या 'मूळ कारणांबद्दल' बोलल्यामुळे आणि तडजोडीचा कोणताही दृष्टिकोन दाखवला नसल्यामुळे हे झालं असावं अशी चर्चा रंगली आहे. पुतिन यांनी कीव आणि युरोपियन मित्र राष्ट्रांना यामध्ये हस्तक्षेप करू नये असा इशारा दिला.
अलास्का शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की त्यांची बैठक खूप चांगली झाली, खरा निकाल करारावर अवलंबून आहे. त्यांनी सांगितले की अनेक मुद्द्यांवर एकमत झालं, युक्रेनमध्ये लोक मरत आहेत ते थांबवणं गरजेचं आहे हे अमेरिकेचं मुख्य ध्येय असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. आम्हाला युद्ध संपलेले पाहायचे आहे, आजच्या चर्चेतून मात्र यावर कोणताही ठोस करार झाला नाही असंही ते म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजच्या शॉन हॅनिटीला सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या संभाषणात, युक्रेन युद्ध जमिनीच्या देवाणघेवाणीद्वारे आणि युक्रेनसाठी काही अमेरिकन सुरक्षा हमी देऊन संपवले जाईल यावर दोघांनीही सहमती दर्शवली. रशियाला काही नवीन प्रदेश देणे आणि कीवला सुरक्षा हमी देणे यासारख्या मुद्द्यांवर करार झाला असं ट्रम्प यांनी सांगितलं. त्यांनी बैठक चांगली झाल्याचं वर्णन केले आणि पुतिन यांना 'मजबूत आणि कठोर' व्यक्ती असल्याचं म्हटलं, चर्चा सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितले.
