अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये एका खासगी डिनर पार्टीमध्ये जोरदार वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सीचे संचालक बिल पुल्टे यांना शिवीगाळ करत थेट हाणामारीची धमकी दिली. तुझ्या तोंडावर ठोसा मारेन असं म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू केला.
advertisement
ही डिनर पार्टी एका आलिशान क्लबमध्ये आयोजित केली होती. ‘पॉलिटिको’ या अमेरिकन वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, हा कार्यक्रम दोन कारणांसाठी खास होता: एक तर क्लबमधील ही पहिली डिनर पार्टी होती आणि दुसरे, ती प्रसिद्ध पॉडकास्टर चमथ पलीहापितिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केली होती. या पार्टीला ट्रम्प प्रशासनातील अनेक मोठे अधिकारी आणि 30 हून अधिक मोठ्या हुद्द्यावरचे पाहुणे उपस्थित होते.
नेमकं काय घडलं?
सूत्रांच्या माहितीनुसार, बेसेंट यांनी अचानक पुल्टे यांच्यावर आरोप करत वातावरण तापवले. बेसेंट म्हणाले, "तू राष्ट्रपतींशी माझ्याबद्दल का बोलत आहेस? तुला माहीत आहे का? मी तुझं थोबाड फोडीन. त्यांचा राग पाहून पुल्टे थक्क झाले. त्यावेळी क्लबचे मालक ओमिद मलिक यांना मध्यस्थी करावी लागली. बेसेंट यांनी पुढे धमकी देत म्हटले, “एकतर तो राहील किंवा मी राहीन, आताच्या आता ठरवा या क्लबमधून कोण बाहेर जाईल.तू बाहेर जा. तुला दाखवतो मग बरोबर अशी भाषा बेसेंट यांनी वापरली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मलिक यांनी दोघांनाही शांत केले. त्यानंतर पुढील वाद टाळण्यासाठी जेवणाच्या टेबलवर दोघांनाही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसवण्यात आलं. ‘पॉलिटिको’च्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनातील अंतर्गत संघर्षामुळे हा वाद झाला. ट्रम्प यांनी मे महिन्यात घोषणा केली होती की, बेसेंट, कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लुटनिक आणि पुल्टे हे तिघे मिळून फेनी मे आणि फ्रेडी मॅक या दोन सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याची योजना तयार करतील. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बेसेंट आणि पुल्टे यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत.
हे कलह आता जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत. दोन्ही मंत्र्यांची भाषा आणि वगणूक पाहता त्यांनी अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची लाज घालवली अशी चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांचा विश्वासू आणि शांत स्वभावाचा मानला जाणारा बेसेंट अनेकदा पुल्टे यांच्यावर त्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत होता. दुसरीकडे, केवळ ३७ वर्षांचे असलेले पुल्टे यांनी आक्रमकपणे काम करत अनेक मोठे निर्णय घेतले आणि व्हाईट हाऊसमध्ये आपले स्थान मजबूत केले. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना हटवायचे की नाही यावरूनही दोघांमध्ये मतभेद आहेत. बेसेंट या निर्णयाच्या विरोधात आहेत, तर पुल्टे पॉवेल यांना पदावरून हटवण्याच्या बाजूने आहेत.