सिडनी: स्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीचवर ज्यू समुदायाच्या हनुक्का उत्सवात झालेल्या भीषण गोळीबारात किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दोन गोळीबार करणाऱ्यांपैकी एका आरोपीची ओळख पटवण्यात आली असून त्याचे नाव नवीद अकरम (वय 24) असे आहे. ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणा या हल्ल्यामागे दहशतवादी हेतू आहे का? याचा तपास करत आहेत. मात्र अद्याप अधिकृतपणे हा दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
advertisement
रविवारी झालेल्या या हनुक्का कार्यक्रमाला सुमारे 1,000 ते 2,000 लोक उपस्थित होते. नवीद अकरम आणि त्याच्या साथीदाराने अचानक गोळीबार सुरू केला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार 50 हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड गोंधळ उडाला. अनेक लोकांनी पळ काढला, तर काहींनी जवळच्या इमारतींमध्ये लपून आश्रय घेतला.
या हल्ल्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर झालेला परिणाम पाहता, ऑस्ट्रेलियाच्या काउंटर-टेररिझम टीम्स या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा हल्ला जाणीवपूर्वक धार्मिक कार्यक्रमाला लक्ष्य करून करण्यात आला का? याचा शोध घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
तपासाचा भाग म्हणून सुरक्षा यंत्रणांनी दक्षिण-पश्चिम सिडनीतील बॉनिरिग (Bonnyrigg) भागात असलेल्या नवीद अकरमच्या घरावर छापा टाकला आहे. या छाप्यात ऑनलाइन कट्टरतावाद, दहशतवादी साहित्य, सोशल मीडिया आणि गाझाशी संबंधित प्रचार साहित्य याचा तपास केला जात आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार बॉनिरिग आणि आसपासचा परिसर याआधीही कट्टरतावादी, एकाकी हल्लेखोर (लोन वुल्फ) आणि ऑनलाइन दहशतवादी नेटवर्क्स संदर्भातील तपासात समोर आला होता.
बॉन्डी बीचवर नेमके काय घडले?
रविवारी संध्याकाळी सुमारे 6:45 वाजता बॉन्डी बीचवरील कॅम्पबेल परेड परिसरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या.
न्यू साउथ वेल्स (NSW) पोलिसांनी या घटनेची पुष्टी करत सांगितले की, या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका संशयित गोळीबार करणाऱ्याचाही समावेश आहे. दुसरा संशयित गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 29 जण जखमी झाले असून, त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी ‘X’ वर पोस्ट करत नागरिकांना परिसर टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण परिसर सध्या लॉकडाऊनमध्ये असून सुरक्षा यंत्रणांची कारवाई सुरू आहे.
