आनंद आणि उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना, कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समोर आली. मोसले होसहल्ली गावात गणेश विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीत भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने गर्दीत घुसला. या दुर्घटनेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 हून अधिक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांश तरुण मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
advertisement
शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास, ही दुर्दैवी घटना घडली. उत्साहाने नाचत- वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या गर्दीत अचानक एक ट्रक घुसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रक प्रथम रस्त्यावरील दुचाकीला धडकून नंतर उजवीकडे वळताना आणि मिरवणुकीत घुसून लोकांना चिरडताना दिसत आहे.
डोळ्यादेखत आपल्या मित्रांना आणि मुलांना ट्रकखाली चिरडले गेल्याचे पाहून अनेक तरुणांनी हंबरडा फोडला. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने हसन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या घटनेनंतर, ट्रकचालक भुवनेश्वर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त जमावाने त्याला पकडून चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. ट्रक एका लॉजिस्टिक्स कंपनीचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जणांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मृत आणि जखमींमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत.
या दुर्दैवी घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीव्र दुःख व्यक्त केला. त्यांनी ट्विट करून घडलेल्या घटनेवर शोक व्यक्त करत माहिती दिली. "एका ट्रकने गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसून अनेक लोकांचा जीव घेतला आणि 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे ऐकून अत्यंत दुःख झाले. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो."
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा आनंदाचा सण एका क्षणात दुःखात बदलल्याने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. या घटनेमुळे उत्सवादरम्यानच्या गर्दीच्या व्यवस्थापनावर आणि रस्त्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.