आरोग्य समस्या असल्यास व्हिसा नामंजूर
ट्रम्प प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच एक सरकारी आदेश जारी केला असून, त्यानुसार व्हिसा अर्ज करणाऱ्या व्यक्तीला जर ओबेसिटी किंवा डायबिटीज यांसारख्या आरोग्य समस्या असतील, तर त्याला अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दूतावासांना आणि वाणिज्य कॉन्सुलट्स पाठवलेल्या या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे की, आजारी व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश दिल्यास ते पब्लिक बर्डन बनू शकतात.
advertisement
आरोग्य तपासणीची व्याप्ती वाढवली
आजवर व्हिसा प्रक्रियेत स्थलांतरितांच्या आरोग्याचे मूल्यांकन केले जात होते. यात प्रामुख्याने क्षयरोग आणि मानसिक आरोग्याची माहिती घेतली जायची. मात्र, या नवीन नियमांमुळे आरोग्य तपासणीची मर्यादा खूप वाढली आहे. आता व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदाराची आरोग्य स्थिती पाहून, त्याचा अर्ज नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा अधिकार मिळाला आहे. एका अहवालानुसार, आजारी लोकांना व्हिसा दिल्यास त्यांच्या उपचारांवर अमेरिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील, असा प्रशासनाचा विचार आहे.
जाडपणा, कर्करोग, हृदयविकार यावर लक्ष
दूतावासांना पाठवलेल्या या पत्रात कोणत्या वैद्यकीय स्थितींचा विशेष विचार करायचा, हे स्पष्ट केले आहे. यात फक्त संसर्गजन्य आजारच नव्हे, तर जाडपणा, हृदयविकार, श्वासोच्छ्वास संबंधीचे रोग, कर्करोग, मधुमेह, मेटाबॉलिक आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार तसेच मानसिक रोगांचाही समावेश आहे. त्यामुळे आता भारतीयांसह इतर देशांतील स्थलांतरितांना अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना 'फिट' असणे आवश्यक झाले आहे.
उपचाराचा खर्च करण्याची क्षमता तपासणार
या नियमांमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, व्हिसा अधिकारी आता अर्जदाराला गंभीर आजार झाल्यास तो स्वतःच्या उपचाराचा खर्च उचलण्यास सक्षम आहे की नाही, याचे मूल्यांकन करतील. या नियमांमुळे कायमस्वरूपी निवासाच्या (पर्मनंट रेसिडेन्स) अर्जांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिका प्रवेशाची प्रक्रिया अधिक जटिल आणि आव्हानात्मक बनली असून, अर्जदारांना आता आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
