पहाटेच्या सुमारास पूर्व तुर्कीच्या सिंदिर्गी शहराला 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के बसले. एकाच प्रदेशात तीन महिन्यांत आलेला हा दुसरा मोठा भूकंप आहे, ज्यामुळे येथील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपामुळे तुर्कीची आर्थिक राजधानी असलेल्या इस्तंबूल आणि पर्यटन स्थळ असलेल्या इझमीर पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता प्रचंड असल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. रात्रीच्या वेळी घरात हादरणाऱ्या भिंती आणि जमीन यामुळे लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत घराबाहेर रस्त्यावर आले.
advertisement
जनहानि नाही, पण नुकसान मोठे
सध्याच्या माहितीनुसार, या भूकंपात कोणतीही जनहानि (कोणाचाही मृत्यू) झाल्याची बातमी नाही, हे मोठे दिलासादायक आहे. मात्र, अंतर्गत व्यवहार मंत्री अली येरलिकाया यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये आलेल्या भूकंपांनंतर रिकामी केलेली तीन इमारती आणि एक दुकान कोसळले आहे. इझमीरपासून 138 किलोमीटर ईशान्येकडील पर्वतीय प्रदेशात वसलेले सिंदिर्गी हे शहर भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानलं जातं.
तुर्कीसाठी भूकंपाचे वारंवार संकट
तुर्की भौगोलिकदृष्ट्या अनेक फॉल्ट लाईन्सवर वसलेला असल्याने हा परिसर भूकंपासाठी अतिसंवेदनशील आहे. याआधी 10 ऑगस्ट रोजी सिंदिर्गीमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप आला होता, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले होते. यापूर्वी, फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण-पश्चिम तुर्कीमध्ये आलेल्या 7.8 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपाने अँटिओकला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते आणि त्यात किमान 53,000 लोकांचा मृत्यू झाला होता.
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाही याच भागात 5.8 तीव्रतेचा भूकंप आला होता. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या भूकंपांमुळे तुर्कीच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
