सिडनी: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बॉन्डी बीच येथे रविवारी दुपारी हनुक्का सण साजरा करत असलेल्या ज्यू समुदायावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या भीषण घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून एक हल्लेखोरही ठार झाला आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांवर गोळीबार केला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका हल्लेखोराचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर दुसरा हल्लेखोर गंभीर जखमी अवस्थेत आहे.
advertisement
या गोळीबारादरम्यान एक नागरिक धैर्याने पुढे सरसावला. त्याने आपला जीव धोक्यात घालून हातात राइफल असलेल्या हल्लेखोराला पकडले आणि त्याच्याकडून शस्त्र हिसकावून घेतले. या नागरिकाच्या धाडसामुळे अनेक निष्पाप लोकांचे प्राण वाचले, असे सांगितले जात आहे.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये नॉर्थ बॉन्डी बीचवर अनेक मृतदेह पडलेले दिसत आहेत. ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि दुःखद असल्याचं म्हटलं आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
