दुसरीकडे, खामेनेई यांच्या मृत्यूचे पडसाद आता विविध देशांमध्ये उमटू लागले आहेत. जगभरातील शिया समुदाय आक्रमक झाला आहे. लेबनान, बगदादी याठिकाणी शिया समुदाय आक्रमक झाला असून खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरला आहे. याचे पडसाद भारताशेजारी असलेल्या पाकिस्तानात देखील उमटले असून पाकिस्तानमधील शिया समुदायाने कराची येथील अमेरिकन दुतावासावर हल्ला केला आहे.
advertisement
मोठ्या संख्येनं एकत्र आलेल्या लोकांनी अमेरिकन दूतावासाबाहेर असलेली सुरक्षा व्यवस्था भेदून आतमध्ये प्रवेश केला. हातात लाकडी दांडके, काठ्या, दगड, लोखंडी रॉड घेऊन नागरिकांनी दूतावासाला टार्गेट केलं. कार्यालयाच्या काचा फोडून लोकांनी इमारतीला आग लावली. या आगीत एकूण ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून पाकिस्तान अमेरिकेसोबत आपले संबंध सुधारवण्याचा प्रयत्न करत होता. पाकिस्तानचे पंतप्रधान सातत्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपर्कात होते. मात्र आता पाकिस्तानमधील शिया समुदायाचे लोक आक्रमक झाले असून त्यांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला केला आहे. इराणमधील घटनेचे अशाप्रकारे पाकिस्तानात पडसाद उमटल्याने पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
