ट्रुथ सोशल (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी 48 तासांची अंतिम मुदत देत संभाव्य कठोर कारवाईचा इशारा दिला. मी इराणला दहा दिवसांत करार करा किंवा होर्मुझ सामुद्रधुनी उघडा असे सांगितले होते, ते लक्षात आहे का? आता वेळ संपत आली आहे. आणखी 48 तासांनंतर त्यांच्यावर भयंकर परिणाम होतील. देवाची कृपा असो!
advertisement
यापूर्वी ट्रम्प यांनी 6 एप्रिलपूर्वी करार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी इशारा दिला होता की, जर सामुद्रधुनी पुन्हा उघडली नाही तर इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले होऊ शकतात. त्यांनी सांगितले की चर्चांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. मात्र लवकरच करार झाला नाही तर अमेरिका वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि प्रमुख निर्यात सुविधा यांवर हल्ला करू शकते.
ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा स्थळांवर होणारे हल्ले 10 दिवसांसाठी थांबवले होते आणि ही मुदत 6 एप्रिलला संपत आहे. दरम्यान इराणने अमेरिकेचे प्रस्ताव अवास्तव, अवैज्ञानिक आणि अतिशयोक्त असल्याचे म्हणत फेटाळले आहेत आणि इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत.
28 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून त्याचा विस्तार संपूर्ण मध्यपूर्वेत झाला आहे. यामध्ये येमेन आणि लेबनॉनमधील सशस्त्र गटांचाही सहभाग वाढला असून परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.
