युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, त्यांनी देशाच्या उपपंतप्रधान युलिया स्वीरिडेन्को यांना पंतप्रधान होण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये झेलेन्स्की म्हणाले की, "आम्ही युक्रेनमधील कार्यकारिणीत बदल सुरू करत आहोत. मी युलिया स्वीरिडेन्को यांना युक्रेनियन सरकारचे नेतृत्व करण्यासाठी आणि त्याचे कामकाज सुधारण्यासाठी आमंत्रित केलं आहे. येणाऱ्या काळात नवीन सरकारची रणनीती सादर करण्यास मी उत्सुक आहे."
advertisement
युलिया या डेनिस श्मिहल यांची जागा घेणार आहेत. डेनिस हे 2020 पासून पंतप्रधानपदावर विराजमान होते, मात्र आता त्यांच्या जागी युलिया स्विरिडेन्को या पदभार सांभाळणार आहेत. युलिया यांना पंतप्रधान बनवून अर्थव्यवस्थेची घडी बसवणे आणि डेनिस यांना संरक्षणमंत्री पद देऊन युद्धाच्या आघाडीवर आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न झेलेन्स्की यांचा आहे. त्यांनी त्यांचा हा निर्णय एका दगडात दोन पक्षी मारणारा असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
युलिया स्वीरिडेन्को कोण आहेत?
युलिया स्वीरिडेन्को या 39 वर्षीय महिला नेत्या असून त्या झेलेन्स्की जवळच्या मानल्या जातात. शिक्षण पूर्ण केल्यानंतर युलियाने यांनी राजकारणात प्रवेश केला. 2008 मध्ये त्यांनी कीव विद्यापीठातून डॉक्टर ऑफ इकॉनॉमिक्सची पदवी घेतलेली आहे. त्या युक्रेनमध्ये आघाडीच्या अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात. खनिज करारांबाबत अमेरिकेसोबत बोलणी करण्याची जबाबदारी झेलेन्स्की यांनी त्यांच्यावर दिली होती. 2021 पासून त्या उपपंतप्रधानपद सांभाळत आहेत.
उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून, त्यांनी वॉशिंग्टनमध्ये युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. 30 एप्रिल रोजी अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांच्यासोबत करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत, युक्रेन आणि अमेरिकेने संयुक्त पुनर्बांधणी गुंतवणूक निधीची स्थापना केली, जो महत्त्वाच्या खनिजे तसेच तेल आणि वायूपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर नियंत्रण ठेवतो.
आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युलिया यांनी कीवमधील युक्रेनियन-अँडोरन रिअल इस्टेट फर्ममध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. २०११ मध्ये, युलिया यांची चीनमधील वूशी येथील चेर्निहिव्हच्या कायमस्वरूपी व्यापार मोहिमेची प्रमुख म्हणून नियुक्ती झाली, जिथे त्यांनी युक्रेनमध्ये चिनी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काम केले. तिच्या प्रयत्नांचा एक परिणाम म्हणजे १००% परदेशी भांडवलाच्या पाठिंब्याने चेर्निहिव्ह-आधारित कंपनी, इको-व्हटोरची स्थापना झाली.
युलिया यांना पंतप्रधानपद का देण्यात आले?
युद्ध सुरु असल्यामुळे सरकारमध्ये कार्यकारी बदल होऊ शकले नव्हते. तसेच झेलेन्स्की यांना डेनिस श्मिहल यांचा पर्यायी उमेदवार सापडला नाही. युलिया या उपपंतप्रधान होत्या, तसेच त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. त्यामुळे युलिया यांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्याकडे पंतप्रधानपद देण्यात आले आहे.
याचे आणखी एक कारण म्हणजे, रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे. त्यामुळे युक्रेनला अमेरिकेच्या पाठिंब्याची गरज आहे. पाठिंब्यासाठी अमेरिकेशी बोलणी करण्याची जबाबदारी आता युलिया यांच्यावर दिली जाणार आहे. त्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
झेनलेस्की यांनीयुलिया यांच्या नावाची घोषणा केली असली तरी त्यांच्या नावाला युक्रेनियन संसदेची मान्यता आवश्यक आहे. आता संसदेची बैठक होईल आणि त्यात युलिया यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, युलिया यांचे पहिले मिशन अमेरिकेशी बिघडत चाललेले संबंध सुधारण्याचे असेल. सध्या युक्रेनचा अमेरिकेत कोणताही राजदूत नाही. हा राजदूत नेमण्यासाठी युलिया यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.